महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कर थकवणाऱ्या विठ्ठल रखुमाई, रामनगर इमारतींना मुंबई महापालिकेकडून जप्तीची नोटीस - Notice

वडाळा बेस्ट डेपोजवळ असलेल्या झोपडपट्टीच्या जागेवर न्यू लूक कंस्ट्रक्शन या विकासकाने विठ्ठल रखुमाई सोसायटी नावाच्या दोन, रामनगर सोसायटीच्या नावाने तीन तर विक्रीसाठी भव्य हाईट्स नावाने एक इमारत बांधली. २००३ आणि २००५ मध्ये बांधलेल्या या इमारतींचा कर विकासकाने पालिकेकडे भरलेला नाही.

विठ्ठल रखुमाई सोसायटी

By

Published : May 15, 2019, 7:06 PM IST

मुंबई - शहरात विकासकांकडून इमारती उभारल्या जातात. मात्र, त्याचा कर महापालिकेला भरला जात नाही. अशा विकासकांवर आणि इमारतींवर पालिकेकडून कारवाई केली जाते. वडाळा येथील विठ्ठल रखुमाई, रामनगर या दोन सोसायटीच्या नावे असलेल्या इमारती पालिकेने ताब्यात घेण्यासाठी नोटीस बजावली आहे. इमारतींवर पालिकेने जप्तीची कारवाई केल्यास या ठिकाणी राहणारी ५२० कुटुंब रस्त्यावर येऊ शकतात, अशी भीती रहिवाशांमध्ये निर्माण झाली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते निखिल डिसोझा व येथील रहिवाशाची प्रतिक्रिया

वडाळा बेस्ट डेपोजवळ असलेल्या झोपडपट्टीच्या जागेवर न्यू लूक कंस्ट्रक्शन या विकासकाने विठ्ठल रखुमाई सोसायटी नावाच्या दोन, रामनगर सोसायटीच्या नावाने तीन तर विक्रीसाठी भव्य हाईट्स नावाने एक इमारत बांधली. २००३ आणि २००५ मध्ये बांधलेल्या या इमारतींचा कर विकासकाने पालिकेकडे भरलेला नाही. या कराची रक्कम सध्या ४ कोटी ५० लाखांहून अधिक आहे. या इमारतीचा कर भरावा म्हणून पालिकेकडून सतत विकासक आणि या इमारतींना नोटीस बजावण्यात आली. मात्र, विकासकाने कर भरण्याकडे दुर्लक्ष केल्याने पालिकेने या इमारतींना जप्तीची नोटीस बजावली आहे.

न्यू लूक कंस्ट्रक्शनने या इमारतींचा कर भरला नसल्याचा प्रकार माहिती अधिकारातून उघड झाला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते निखिल डिसोझा यांनी माहिती अधिकारातून याबाबतची माहिती मागवली होती. विकासकाने इमारतींचा ४ कोटी ५० लाख रुपयांचा कर भरला नसल्याने डिसोझा यांनी मुख्यमंत्री, पालिका आयुक्त, पालिकेचे विभाग कार्यालय आदी ठिकाणी तक्रार करून हा कर वसूल करावा, अशी मागणी लावून धरली होती. त्यानंतर पालिकेने आता या इमारतींना सात दिवसात करा भरला नाही तर इमारत जप्त करू अशी नोटीस बजावली आहे.

५२० कुटुंब रस्त्यावर येणार -

विठ्ठल रखुमाई आणि रामनगर सोसायटीच्या नावाने असलेल्या पाच इमारतींमध्ये ४३० कुटुंब राहतात. तसेच विकासकाने विक्रीसाठी बांधलेल्या भव्य हाईट्स या इमारतींमध्ये ९० कुटुंब राहतात. विकासकाने या इमारतींचे कर पालिकेकडे न भरल्याने या इमारती जप्त करण्याची नोटीस पालिकेने दिली आहे. विकासकाने ४ कोटी ५० लाखांचा कर न भरल्यास या ५३० कुटुंबाना रस्त्यावर यावे लागणार असल्याची माहिती निखिल डिसोझा यांनी दिली.

इमारतींमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा नाही -

पालिकेच्या आणि मुंबई अग्निशमन दलाच्या नियमानुसार इमारतींमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा असणे गरजेचे आहे. न्यू लूक कंस्ट्रक्शन या विकासकाने बांधलेल्या विठ्ठल रखुमाई व रामनगर सोसायटीच्या पाचही इमारतींमध्ये अग्निसुरक्षेच्या यंत्रणा बसवण्यात आलेल्या नाहीत. अग्निसुरक्षेच्या यंत्रणा नसल्याने याठिकाणी आग लागल्यास मोठी जीवित आणि वित्त हानी होऊ शकते. त्यासाठी येथील रहिवाशांनी मुंबई अग्निशमन दलाकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. त्या तक्रारींकडे मुंबई अग्निशमन दल दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details