मुंबईतील 1 हजार 961 झाडांवर कुऱ्हाड, पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी - मुंबई ताज्या बातम्या
विकास कामांच्या नावाखाली मुंबईत हजारो झाडांची कत्तल होत आहे. त्यात आता आणखी नवीन 1 हजार 961 झाडांवर लवकरच कुऱ्हाड कोसळणार आहे. याबाबात महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने परवानगीची नोटीस काढली आहे. मात्र, या प्रकारावर पर्यावरणप्रेमींकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
मुंबई- विकास कामांच्या नावाखाली मुंबईत हजारो झाडांची कत्तल होत आहे. त्यात आता आणखी नवीन 1 हजार 961 झाडांवर लवकरच कुऱ्हाड कोसळणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने विविध कामासाठी तब्बल 1 हजार 961 झाडांच्या कत्तलीच्या परवानगीसाठी नोटीस काढली आहे. यावरुन आता पर्यावरणप्रेमी प्रचंड नाराज झाले आहेत. टाळेबंदीमध्ये ही प्रक्रिया का राबवली जात आहे, असा सवाल करत त्यांनी यावर आक्षेप घेतला आहे.
वृक्ष प्राधिकरणाने जूनमध्ये 1 हजार 961 झाडांच्या कत्तलीसाठी नोटीस काढत त्यासाठी सूचना-हरकती मागवल्या आहेत. त्यानुसार मेट्रो 6 आणि मेट्रो 2 बच्या कामासाठी 320 झाडे, रस्त्याच्या कामासाठी 326 झाडे, रेल्वेच्या कामासाठी 146 झाडे तर गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यासाठी 382 झाडे, अशी ही 1 हजार 961 झाडे आहेत. टाळेबंदीच्या काळात निघालेल्या या नोटीसबाबत अनेक पर्यावरणप्रेमींना माहितच नव्हते. टाळेबंदीमध्ये अशी काही नोटीस निघेल, अशी शक्यता नसल्याने पर्यावरणप्रेमींनी ही नोटीस पाहिली नाही. त्यामुळे यावर सूचना-हरकती नोंदवता आल्या नाहीत, अशी माहिती पर्यावरणप्रेमी झोरू बाथेना यांनी दिली आहे.
आता मात्र ही माहिती समोर आल्याने पर्यावरणप्रेमी प्रचंड नाराज झाले आहेत. टाळेबंदीमध्ये अशी नोटीस काढलीच का? असा सवाल बाथेना यांनी केला आहे. तर आता मात्र याला जोरदार विरोध करणार असून अधिकाधिक लोकांनी यावर सूचना-हरकती नोंदवाव्यात असे आवाहन बाथेना यांनी केले आहे. दरम्यान जानेवारी ते 15 जून, 2020 पर्यंत वृक्ष प्राधिकरणाने काढलेल्या नोटिशीनुसार लवकरच 5 हजार 300 झाडांवर कुऱ्हाड कोसळणार असून हा आकडा पर्यावरणप्रेमींची चिंता वाढवणारा आहे.