महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत "डॉक्टर आपल्या दारी", मिशन झिरो अंतर्गत संशयितांची घरोघरी जाऊन होणार तपासणी - महापौर किशोरी पेडणेकर

मुंबईतील काही भागांमध्ये रुग्ण दुप्पटीचा कालावधी सरासरीपेक्षा कमी असल्याचे लक्षात घेऊन त्या विभागांमध्ये शीघ्र कृती कार्यक्रम राबविण्याचे महानगरपालिकेने निश्चित केले. या अनुषंगाने पावले उचलत “मिशन झिरो” अर्थात शून्य कोविड रुग्ण लक्ष्यांक गाठण्यासाठी या उपक्रमाचा आरंभ करण्यात आला आहे.

Mission Zero
मुंबईत मिशन झिरो अंतर्गत संशयितांची घरोघरी जाऊन होणार तपासणी

By

Published : Jun 26, 2020, 7:41 AM IST

मुंबई - कोरोना संशयितांचा शोध घेण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने 'मिशन झिरो' अंतर्गत 'डॉक्टर आपल्या दारी" योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच उत्तर मुंबईसाठी 'मिशन झिरो'चा शुभारंभ झाला होता. आता मुंबई शहर विभागातील वरळी, अँटॉप हिल, डोंगरी, वडाळा, चर्नी रोड, गिरगाव, फोर्ट, कुलाबा, दादर आदी विभागांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

लोअर परेल येथील मुंबई शहर विभागासाठी क्रेडाई-एमसीएचआय, भारतीय जैन संघटना आणि देश अपनाये यांच्यावतीने ७ अॅम्ब्युलन्स महापालिकेच्या ताब्यात देण्यात आल्या. या अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून घराघरात जाऊन नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. संशयित व्यक्ती असल्यास त्याचा स्वॅब घेऊन चाचणी केली जाणार आहे. यामुळे रुग्णांना लवकरात लवकर उपचार करणे शक्य होणार आहे. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन केल्याने कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिकेला यश येईल, असा विश्वास महापौर पेडणेकर यांनी व्यक्त केला.

मुंबईतील काही भागांमध्ये रुग्ण दुप्पटीचा कालावधी सरासरीपेक्षा कमी असल्याचे लक्षात घेऊन त्या विभागांमध्ये शीघ्र कृती कार्यक्रम राबविण्याचे महानगरपालिकेने निश्चित केले. या अनुषंगाने पावले उचलत “मिशन झिरो” अर्थात शून्य कोविड रुग्ण लक्ष्यांक गाठण्यासाठी या उपक्रमाचा आरंभ करण्यात आला आहे. क्रेडाई-एमसीएचआय, भारतीय जैन संघटना आणि देश अपनाये यांच्यातर्फे राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा दक्षिण मुंबईकरांना लाभ होणार असल्याचे महापौरांनी सांगितले. कोविडवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेतर्फे आतापर्यंत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे या उपक्रमाला सहयोग द्या आणि महानगरपालिकेची 'मिशन झिरो' आणि "डॉक्टर आपल्या दारी" मोहिम यशस्वी करा, असे आवाहन यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details