मुंबई -मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मुंबईमधील मृत्यू दर 3.3 टक्के होता. मात्र नोंद न केलेल्या कोरोना मृत्यूंच्या नोंदी नंतर हा दर 5.7 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबई महापालिकेच्या 24 पैकी 20 वार्डमधील मृत्यूदर राज्य आणि केंद्राच्या मृत्यूदरापेक्षाही जास्त आहे. यामुळे मुंबईमधील मृत्यूदर कमी करणे हे पालिकेपुढील मोठे आव्हान आहे.
मुंबईमधील लोकसंख्येच्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिकेला यश आले आहे. तरीही रोज वाढणाऱ्या रुग्णांमुळे पालिकेची डोकेदुखी वाढतच आहे. त्यातच रोज होणारे मृत्यू ही चिंतेची बाब आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मृत्यूंची संख्या कमी ठेवण्यात पालिकेला यश आले होते. मात्र, कोरोनाच्या मृत्यूंची आकडेवारी लपवल्याचा आरोप पालिकेवर झाला. त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशाने 16 जून रोजी पालिकेने 862 मृत्यूंची नोंद पालिकेला करावी लागली. यामुळे मुंबईतील मृत्यू दर 3.3 वरून 5.7 टक्क्यांवर गेला आहे. देशाचा मृत्यूदर 3 टक्के आणि राज्याचा मृत्यूदर 4.5 असताना मुंबईचा मृत्यूदर 5.7 टक्के असल्याने हा दर कमी करण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे.
मुंबई पालिकेच्या साथ सर्वेक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार पालिकेच्या 24 वार्डापैकी 20 वॉर्डाचा मृत्यूदर तर देशाच्या मृत्यूदरापेक्षाही जास्त आहे. दहिसर, मालाड, कांदिवली, मुलुंड, कुलाबा या भागांतील मृत्यूदर हा तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर अंधेरी पूर्व, दादर, माहीम, धारावी, भांडुप, कुर्ला, वरळी, वांद्रे पूर्व, शीव-वडाळा, भायखळा, देवनार-मानखुर्द, गोरेगाव, चेंबूर-गोवंडी, वांद्रे पश्चिम, मशीद बंदर सर्व भागांत मृत्यूदर तीन टक्क्यांच्या पुढे आहे.
चेंबूर, गोवंडी या भागाचा मृत्यूदर सर्वाधिक म्हणजेच 10 टक्के इतका आहे. त्याखालोखाल वांद्रे पूर्वमध्ये 8.7 टक्के आणि डोंगरी, मशीद बंदर भागात 8.16 टक्के इतका आहे. दरम्यान, मधुमेह, उच्च रक्तदाब आदी दीर्घ आजार हे मृत्यूदर जास्त असण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण असल्याचे मत पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, पालिकेच्या बी विभागातील डोंगरी, मशीद बंदर, उमरखाडी या विभागात फक्त 722 रुग्ण कोरोनाचे आहेत. मात्र या विभागातील मृत्यू दर 8 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. या भागात वृद्धांची किंवा 60 वर्षांवरील लोकांची संख्या जास्त आहे, हेही त्यामागील एक कारण आहे. मात्र, आता या भागातील रुग्णवाढीचा दर एक टक्क्यापेक्षाही कमी असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.