मुंबई -वाडिया रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू आहे. ट्रस्टकडून मनमानी पद्धतीने हवी तशी कर्मचारी भरती करण्यात आली आहे. परवानग्या न घेताच रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवण्यात आली असून पालिका आणि वाडिया ट्रस्टमध्ये झालेल्या कराराचे उल्लंघन केले जात असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी बोलावलेल्या वाडिया संदर्भातील बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना हे रुग्णालय सन १९२६ आणि १९२८ यामध्ये परळ भागात गिरणी कामगारांसाठी मोफत रुग्णालय उभारण्यात आले. त्यावेळी १२० खाटांचे रुग्णालय बांधण्याचा करार पालिका आणि वाडिया रुग्णालयात करण्यात आला. त्यातील ५० खाटा गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. पुढे हे रुग्णालय प्रसूती व लहान मुलांसाठी सुरू करण्यात आले. मात्र, अचानक केलेल्या पाहणीत नियमानुसार ठरलेले शुल्क न आकारता दुप्पट, तिप्पट शुल्क आकारले जात असल्याचे निदर्शनास आले. तसेच ट्रस्टने उत्पन्न व खर्चाचा आजमितीस अहवालही दिलेला नाही, असे प्राथमिक चौकशीतून समोर आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
वाडिया रुग्णालयातील गैरप्रकाराबाबद माहिती देताना पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी हेही वाचा - वाडिया रुग्णालय बंद पडण्याच्या मार्गावर.. ट्रस्टला पालिकेकडून 137.29 करोडोंची येणे बाकी
या रुग्णालयात काम करणारे १० ते १५ अधिकारी, कर्मचारी दुबार वेतन आणि निवृत्ती वेतन घेत असल्याचेही उघड झाले आहे. नियमानुसार रुग्णालय चालवले जात नसल्याने पालिकेने गेल्या डिसेंबर महिन्याचे २१ कोटींचे अनुदान दिले नाही. याबाबत मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला वाडिया ट्रस्टचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत.
रुग्णालयात १२० अधिक १२६ अशा एकूण २४६ खाटा होत्या. त्यातील ५० खाटा गिरणी कामगारांसाठी मोफत सेवा देण्यासाठी उपलब्ध करण्यात आल्या. याबाबत वाडिया, राज्य सरकार व पालिका यांच्यात करार झाला. मात्र, आजमितीस खाटांची संख्या ९२५ पर्यंत वाढली आहे. शासन निर्णयानुसार ३१८ पदे मंजूर आहेत. म्हणजेच येथे ३१९ अधिकारी कार्यरत असतात. परंतु, वाडिया रुग्णालयात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त स्टाफ नियुक्त करण्यात आला आहे. खाटा व स्टाफ वाढवण्याबाबत ट्रस्टने पालिका प्रशासनाला विचारात न घेता हा निर्णय घेतला. हे कराराचा भंग करणारे असल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले आहे.
दुप्पट वेतन आणि पेन्शनही -
या रुग्णालयात ६ व्यक्तींना प्रसूतीगृहाचे वेतन आणि बाल रुग्णालयाचे मानधनही मिळत असल्याचे समोर आले. तर, १० जणांना दोन्ही आस्थापनांकडून पेन्शन मिळत असल्याचे निदर्शनास आले. हे दुबार मिळणारे वेतन १ लाख ६१ हजार ९४२ तर, मानधन १ लाख ६५ हजार ५१२ इतके आहे. याबाबत चौकशी सुरू असून त्यामुळे काही रक्कम पालिकेने राखून ठेवली असल्याची माहिती आहे.
हेही वाचा - वाडिया रुग्णालयाला महापालिकेकडून 13 कोटींचा निधी