मुंबई -कोरोनाच्या संकटाबरोबर आता मुंबई महानगर पालिकेसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. एकीकडे कोरोना नियंत्रणासाठी पालिकेने 610 कोटी खर्च केले आहेत. तर दुसरीकडे उत्पन्नाचे सर्व स्त्रोत बंद असल्याने कोट्यवधीचा महसूल बुडाला आहे. त्यामुळे आता पालिकेला निधीची चणचण भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने स्टेट डिझास्टर रिफिल फंड (राज्य आपत्कालीन निधी) मधील 200 कोटींपैकी उर्वरित निधी देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
देशात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याबरोबर पालिका कामाला लागली. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली. मार्चमध्ये मुंबईत रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आणि बघता बघता हा आकडा वाढला. त्यामुळे कोरोना नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्या लागल्या, तर मनुष्यबळही मोठ्या प्रमाणावर उभारावे लागले. यासाठी पालिकेला मोठा खर्च करावा लागला. आतापर्यंत यावर पालिकेने 610 कोटी खर्च केला आहे. तर राज्य सरकारकडे स्टेट डिझास्टर रिलीफ फंडमधून पालिकेने 200 कोटींच्या निधीची मागणी केली होती. या मागणीप्रमाणे राज्य सरकारने पालिकेला आतापर्यंत 79 कोटी दिल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.