मुंबई BMC Dead Body Bag Scam : कोरोना काळातील कथित डेड बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं चौकशी केल्यानंतर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या अंमलबजावणी संचलनालयाच्या रडारवर आल्या आहेत. ईडीनं किशोरी पेडणेकर यांना 8 नोव्हेंबरला चौकशीसाठी बोलावलं आहे. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांना आज (7 नोव्हेंबर) चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. बॉडी बॅग घोटाळ्यात त्यांची आज चौकशी करण्यात येणार आहे.
इतर अधिकाऱ्यांचीही करणार चौकशी?: या प्रकरणी ईडी लवकरच महापालिकेच्या बाकी अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावणार असल्याची शक्यता आहे. ईडीनं अलीकडचं डेड बॉडी बॅग प्रकरणी अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवाल (ECIR) दाखल केला आहे. एजन्सीच्या एका सूत्रानं याची पुष्टी केली आहे. कोरोना महामारीच्या काळात बीएमसीच्या कामकाजातील अनियमिततेच्या संदर्भात ईडीनं नोंदवलेला हा दुसरा मनी लाँड्रिंगचा गुन्हा आहे. यापूर्वी, कोविड जंबो सेंटर घोटाळ्याप्रकरणी पीएमएलए गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर जुलै महिन्यात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि सहकारी सुजित पाटकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रमाकांत बिरादार यांची चौकशी :एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, ईडीकडून कथित घोटाळ्याच्या मनी लाँड्रिंगची चौकशी केली जाईल. तर आर्थिक गुन्हे शाखा घोटाळ्याच्या गुन्हेगारी प्रकरणाची चौकशी करत आहे. काही दिवसांपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेनं बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी उपनगरीय आयुक्त रमाकांत बिरादार यांची चौकशी केली होती. ते कोरोना महामारीच्या काळात नागरी संस्थेच्या केंद्रीय खरेदी विभागाचे (CPD) प्रभारी होते.
बॉडी बॅग घोटाळ्यात गुन्हा दाखल :कोरोना महामारीच्या काळात बीएमसीच्या कामकाजातील कथित अनियमिततेच्या चौकशीचा भाग म्हणून ईडीनं बिरादार यांचा जबाब नोंदवला होता. चौकशीत असलेल्या खासगी कंपनीनं मृत रुग्णांसाठी बॉडी बॅग प्रति बॅग 6 हजार 719 रुपये या दराने बीएमसीला पुरवल्याचं ईडीच्या पूर्व तपासात आढळून आलं. तर बाजारात प्रति बॉडी बॅग सुमारे 2 हजार रुपयांना उपलब्ध होती. 18 जुलै रोजी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कोरोना महामारीच्या काळात खर्चात अनियमितता केल्याचा आरोप करत केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
किशोरी पेडणेकरांवर आरोप काय? :कोरोना काळात मुंबई महापालिकेकडून रुग्णालयांसाठी मृतदेहांच्या बॉडी बॅग खरेदी करताना 1800 रुपयांची एक बॅग 6800 रुपयांना विकत घेतल्याचं सांगितलं जातय. हा व्यवहार माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सूचनेनुसार झाल्याचा आरोपही करण्यात आलाय. आर्थिक गुन्हे विभागाकडून कथित आरोपांनंतर मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात 5 ऑगस्ट 2023 ला किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात कलम 420 अंतर्गत फसवणुकीचा तर कलम 120 ब अंतर्गत जाणीवपूर्वक कारस्थान करुन घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. महापालिकेत कोरोना काळात कथित चार मोठे घोटाळे झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
हेही वाचा -
- Kishori Pednekar News : कथित बॉडी बॅग गैरव्यवहार प्रकरणी किशोरी पेडणेकर यांना दिलासा, २४ ऑगस्टपर्यंत अटकेपासून संरक्षण
- Kishori Pednekar News : ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांची आर्थिक गुन्हे शाखेकडून दोन तास चौकशी, नेमक प्रकरण काय?
- Body Bag Scam Case : कोविड बॉडी बॅग प्रकरण; किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढल्या, ED कडून गुन्हा दाखल