मुंबई: ईडीने बृहन्मुंबई महापालिकेच्या केंद्रीय खरेदी विभागात गुरुवारी झाडाझडती घेतली आहे. कोरोनाच्या काळात सुरू करण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरमधील कामांमध्ये अनियमितता झाल्याचा ईडीला संशय आहे. त्याबाबत ही कारवाई होती, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांची संपत्ती सुमारे 100 कोटी रुपयांची असल्याचे एका वृत्तात म्हटले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे हे खरेदी विभाग कार्यालय (सीपीडी) दक्षिण मुंबईतील भायखळा येथे आहे. कार्यवाहीत गुंतलेल्या ईडीच्या पथकाने सुजित पाटकर आणि तीन भागीदारांशी निगडीत फर्मला दिलेल्या निविदा आणि कराराशी संबंधित कागदपत्रे कार्यालयात तपासली, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. ईडीने बुधवारी सुजित पाटकर यांच्या निवासस्थानासह 15 ठिकाणांची धाडी टाकल्या आहेत. पाटकर हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे जवळचे मित्र आहेत.
गतवर्षी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल:ईडीने भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी संजीव जयस्वाल आणि ठाकरे गटाचा पदाधिकारी सूरज चव्हाण याच्या घरीही धाडी टाकल्या आहेत. लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस फर्म, पाटकर आणि त्याच्या तीन भागीदारांविरुद्ध गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मुंबई पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दक्षिण मुंबईतील आझाद मैदान पोलिस ठाण्यात एफआयआरच्या आधारे, ईडीने मनी लाँडरिंगबाबत तपास करण्यासाठी गुन्हा नोंदवला आहे.
अधिकाऱ्यासह काही जणांची ईडी करणार चौकशी:ईडीने कारवाईत 2.4 कोटी रुपयांचे दागिने आणि 68 लाख रुपये रोख जप्त करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. ईडीने समन्स पाठवून जयस्वाल यांना बॅलार्ड इस्टेट येथील ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. परंतु ते गैरहजर राहिल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. ईडीने सूरज चव्हाण आणि इतर काही जणांना सोमवारी आणि पुढील काही दिवस सविस्तर चौकशीसाठी बोलाविले आहे.
संजय राऊत यांचे मंत्र्यांवर गंभीर आरोप-ईडीची कारवाई म्हणजे राज्यातील गृहविभागाचे अपयश असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार राहुल कुल, मंत्री दादा भुसे यांची ईडी चौकशी करावी, अशी राऊत यांनी मागणी केली आहे. तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचा त्यांनी आरोप केला आहे. झाकीर नाईक याच्याकडून विखे पाटलांच्या संस्थेला देणगी मिळाल्याचा गंभीर आरोपही राऊत यांनी केला.
राज्यात लोकशाहीची हत्या:आदित्य ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदे सरकार घाबरल्याने भ्याडांसारखे लढत आहे. ठाकरे गट लोकशाहीसाठी लढत आहे. त्यामुळे केंद्राच्या तपास यंत्रणांकडून अशी सूडबुद्धीची कारवाई होत आहे. बीएमसीमधील कथित भ्रष्टाचाराविरोधात ठाकरे गटाने 1 जुलै रोजी विराट निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याने निकटवर्तीयांवर कारवाई करण्यात आल्याचा दावा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. निवडणुकीला सामोरे जायला आम्ही तयार आहोत. मग त्यांनाही निवडणुकीच्या रणांगणात यावे लागेल. राज्यात लोकशाहीची हत्या झाल्याचे देश व जग पाहत आहे. आदित्य ठाकरे यांनी ठाकरे गटाचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांची भेट घेतली आहे.
हेही वाचा-
- ED raids in Mumbai: मुंबईत ईडीची सलग १७ तास छापेमारी, ठाकरे निकटवर्तींयासह आयएएस अधिकारी, बीएमसी अधिकारी लागणार गळाला?
- Sanjay Raut News: या कर्माची फळ त्यांना भोगावे लागतील... ठाकरे कुटुंबाची सुरक्षा कमी केल्याने संजय राऊत आक्रमक