मुंबई - हाजी आली दर्ग्यासमोर एका अज्ञात वाहनाने डेब्रिज टाकले होते. त्यामुळे या विभागातील वाहतूकीवर परिणाम झाला होता. त्यानंतर महापालिका प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने ७२ तासात त्या डेब्रिज टाकणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. महापालिका प्रशासनाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
मुंबई शहराकडे पश्चिम उपनगरात ये जा करताना हाजी अली दर्ग्यासमोरील रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या रस्त्यावर लाला लजपत राय मार्गावर ११ जून रोजी एका अज्ञात वाहनामधून डेब्रिज टाकण्यात आला होता. याकारणाने या रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. याबाबतची माहिती मिळताच पालिकेच्या दक्षिण विभागाने पोलीस तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तीन विशेष पथकांद्वारे शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. या शोध पथकांमध्ये २ महापालिका अधिकाऱ्यांसह ५ कनिष्ठ आवेक्षकांचा (J.O.) समावेश होता. याठिकाणी सीसीटीव्ही नसल्याने या मार्गावर इतर ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेण्यात आला.