मुंबई -शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामासाठी आरेमधील २ हजार २०० झाडे तोडली जाणार आहेत. झाडे तोडण्याला पालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने विरोध केला आहे. मात्र, शिवसेना आणि काँग्रेसच्या विरोधात भाजपने भूमिका घेतली आहे. मेट्रोचे काम करणाऱ्या एमएमआरसीएलने एका झाडाच्या बदल्यात ६ झाडे लावण्याचे तसेच विस्थापितांना पीएपीची घरे देण्यास पुढाकार घेतला आहे. आरेच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. यामुळे मेट्रोसारखा पथदर्शी प्रकल्प थांबवू नये, असे भाजपचे नगरसेवक व वृक्ष प्राधिकरण सदस्य अभिजित सामंत यांनी म्हणाले.
आरेमध्ये एका झाडाच्या बदल्यात ६ झाडे लावू मात्र मेट्रोसारखा पथदर्शी प्रकल्प थांबवू नये - अभिजित सामंत मुंबईत मेट्रोचे जाळे उभारले जात आहे. मेट्रोच्या कारशेड उभारणीसाठी मुंबईत हिरवळ असलेल्या गोरेगाव येथील आरेची जागा निश्चित करण्यात आली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने कार शेडसाठी २ हजार २३८ झाडे कापण्याचा प्रस्ताव पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीपुढे मंजुरीसाठी सादर केला आहे. ही झाडे मेट्रोसाठी उभारण्यात येणाऱ्या कार डेपोच्या बांधकामात अडथळा ठरत आहेत. ही झाडे कापण्यास पर्यावरण प्रेमींकडून तीव्र विरोध होत असल्याने हा प्रस्ताव गेल्या दोन वर्षांपासून रखडला आहे. त्यानंतर मागील आठवड्यात हा प्रस्ताव वृक्षप्राधिकरण समितीपुढे मंजुरीसाठी आणण्यात आला होता. या प्रकल्पामुळे २७ आदिवासी पाडे विस्थापित होण्याचा तसेच त्या पाड्यातील नागरिकांच्या
उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आदिवास्यांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. झाडे तोडण्याच्या विरोधात ८० हजार तक्रारी आल्या आहेत. त्याचे पुढे काय झाले? या सर्व कारणांमुळे मेट्रोच्या कारशेडसाठी झाडे तोडण्याला शिवसेना आणि काँग्रेसकडून विरोध केला जात आहे. आरेमधील कारशेडसाठी झाडे तोडण्याचा प्रस्ताव गेल्या दोन वर्षांपासून वृक्ष प्राधिकरण समितीपुढे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. झाडे तोडण्याचा प्रस्ताव शिवसेनेनेसह काँग्रेसने विरोध केल्याने राखून ठेवण्यात आला आहे.
दरम्यान आरेमधील जागा मुंबईच्या विकास आराखड्यात मेट्रो कारशेडसाठी आरक्षीत करण्यात आली आहे. या जागेवर १ हजार २०० झाडांना फळे आणि फुले येत नाहीत. याठिकाणी ६००-७०० झाडे सुबाभूळची आहेत. अशी झाडे भारतात लावूच नये. या झाडांवर येथील आदिवासी आपली गुजराण करू शकत नाहीत. या झाडांचा वापर फक्त लाकडांसाठी होऊ शकतो, असे अभिजित सामंत यांनी सांगितले.
आरे परिसरात आदिवासी पाडे आहेत. मात्र, कारशेडसाठी जी जागा निश्चित केली आहे त्यापासून हे आदिवासी पाडे दूर आहेत. या प्रकल्पामुळे आरे परिसरातील बाधितांना एमएमआरसीएल कंपनीने ३०० पर्यायी घरे दिली आहेत. आरेमध्ये १४ हजार अतिक्रमणे झाली आहेत. आरेच्या जागेवर जास्त अतिक्रमणे होऊ नये यासाठी असा सुंदर भाग सोडून दिला तर त्यावर आणखी अतिक्रमणे होऊ शकतात. जितका उशीर करू तितका प्रकल्पाचाही खर्च वाढणार आहे. त्यामुळे या जागेवर मेट्रो कारशेड त्वरित बांधले पाहिजे, असे सामंत म्हणाले. मेट्रो प्रकल्पासाठी एक झाड तोडल्यास त्याबदल्यात ६ झाडे लावण्याचे एमएमआरसीएलने मान्य केले आहे. युती सरकारच्या काळात नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग बनवला. त्यावेळीही झाडे तोडण्यात आली होती. प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावण्यात आली आहेत.