मुंबई- पावसाळा गेला तरी मुंबईमधील रस्त्यांवर आजही खड्डे आहेत. खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने मागील आठवड्यात 'खड्डे दाखवा अन् ५०० रुपये मिळवा' ही योजना सुरू केली होती. याला मुंबईकरांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेच्या अॅपवर मागील चार दिवसांत खड्ड्यांच्या ९९७ तक्रारी नोंद झाल्या. यामध्ये पहिल्या तीन दिवसांत दाखल झालेल्या ८७९ तक्रारींपैकी ७९४ खड्डे म्हणजेच ९० टक्के खड्डे २४ तासांत बुजवण्यात आले आहेत. मात्र ८५ खड्डे २४ तासांत बुजवता न आल्याने संबधित वॉर्ड अधिकाऱ्यांना खड्ड्याची तक्रार करणाऱ्या नागरिकांना ४२ हजार ५०० रुपये बक्षिस खिशातून द्यावे लागणार आहे.
पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने कंत्राटदारांची नेमणूक करून तब्बल ८० कोटी रुपयांचे कंत्राट दिले. मात्र, तरीही मुंबईत अनेक ठिकाणी खड्यांनी रस्त्यांची चाळण झाली आहे. मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मलमपट्टी सुरू असल्याने अल्पावधीतच पुन्हा खड्डे पडत असल्याच्या तक्रारी आहेत. नोव्हेंबर उजाडला तरी खड्डे बुजत नसल्याने मुंबईकरांमध्ये संतापाच्या प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे प्रशासनाने अखेर यावर पर्याय शोधत मोठ्या आकाराच्या खड्ड्यांची तक्रार करा आणि तक्रारीनंतर २४ तासांमध्ये ते न बुजल्यास ५०० रुपयांचे बक्षीस देण्याची योजना लागू केली.