मुंबई- महापालिकेला कर स्वरुपातून मिळणारा महसूल कमी झाला असून महसूल वाढीसाठी महापालिकेने मालमत्ता कर वसुली सुरू केली आहे. यानुसार ३ हजार १७९ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. तर २१३ मालमत्ता धारकांचे पाण्याचे कनेक्शन कापण्यात आले आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. दुसरीकडे मालमत्ता कर वसुलीसाठी खासगी संस्थांची मदत घ्यावी, अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली आहे.
मुंबई महापालिका क्षेत्रात सुमारे ४ लाख ५० हजार मालमत्ता धारक असून यामध्ये १ लाख २७ हजारांपेक्षा अधिक निवासी, ६७ हजारांपेक्षा अधिक व्यवसायिक, औद्योगिक स्वरुपाच्या ६ हजारांपेक्षा अधिक, १२ हजार १५६ भूभाग आणि इतर प्रकारच्या मालमत्तांचा समावेश आहे. त्यापैकी ३ हजार ३९२ मालमत्तांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सुमारे १ हजार ३७६ कोटींचा मालमत्ता कर थकित असणा-या ३ हजार १७९ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. तर २६९ कोटींपेक्षा अधिकची थकबाकी असणा-या २१३ मालमत्ता धारकांचे पाणी कनेक्शन तोडण्यात आले आहे.