महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिमालय पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटकडे दुर्लक्ष, पालिका प्रशासनाची कबुली - Bombay

गुरूवारी पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मुंबई शहर विभागातील पुलांच्या दुरुस्तीबाबत प्रस्तावावर चर्चा झाली. या चर्चे दरम्यान पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटकडे दुर्लक्ष झाल्याची धक्कादायक कबुली खुद्द पालिका प्रशासनाने दिली.

संग्रहीत फोटो

By

Published : Apr 5, 2019, 9:36 AM IST

मुंबई - सीएसटीएम येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला होता, तर ३४ जण जखमी झाले होते. गुरूवारी पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मुंबई शहर विभागातील पुलांच्या दुरुस्तीबाबत प्रस्तावावर चर्चा झाली. चर्चे दरम्यान पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटकडे दुर्लक्ष झाल्याची धक्कादायक कबुली खुद्द पालिका प्रशासनाने दिली. त्यामुळे ऑडिटरवर दुर्घटनेचे खापर फोडणाऱया प्रशासनाचा हलगर्जीपणाही या घटनेला कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा

दरम्यान पुलांच्या दुरुस्तीसाठी सल्ला देणाऱ्या डी. डी. देसाईंचे नाव हटवून १६ पुलांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील या पुलांचे दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. कुलाबा, ग्रॅन्टरोड, चंदनवाडी, भायखळा या वर्दळीच्या भागातील १६ पुलांची दुरुस्ती केली जाणार असून त्यासाठी १३ कोटी ८६ लाख, ४० हजार ८९ रुपये खर्च केला जाणार आहे. सीएसटीएम येथील हिमालय पूल दुर्घटनेत दोषी ठरलेल्या डी. डी. देसाईज् असोसिएटेड कंपनीच्या सल्ल्याने पुलांच्या दुरुस्ती करण्याच्या प्रशासनाच्या आश्चर्यकारक निर्णयामुळे पुन्हा वादाची ठिणगी पडली.

या पुलाच्या दुरुस्तीचा डी. डी. देसाई कंपनीचा अहवाल सप्टेंबर २०१६ मध्ये आला होता. पुलाची स्थिती चांगली असल्याचे अहवालात म्हटले असले तरी काही किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तत्पूर्वी पूल विभागाला न कळवताच २०१६- १७ मध्ये वॉर्ड स्तरावर या पुलाचे सुशोभीकरण करण्यात आले होते. त्यावेळी मुख्य अभियंत्यांचा सल्लाही घेण्यात आला नव्हता. नियमबाह्य सुशोभीकरणामुळे अतिभाराने पूल कोसळल्याचे यावेळी स्थायी समितीत अनुमान काढण्यात आले. त्यामुळे तत्कालीन सहायक आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही लावून धरण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी डी. डी. देसाईचे नाव प्रस्तावातून काढून टाकण्याची उपसूचना मांडली. सभागृहाने ती एकमताने मान्य केली आणि या १६ पुलांच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला.

आयआयटीकडून पुलांचे होणार मूल्यमापन -

प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी सांगितले की, डी. डी देसाई कंपनीच्या सल्ल्यानुसार आणि त्यांच्या सल्ल्याने नियुक्त करण्यात आलेल्या जैन इन्फ्रास्ट्रक्चरला बांधकामाचा ठेका देण्यात येणार आहे. असे असले तरी या कामाचे मूल्यमापन आयआयटी आणि व्हीजेटीआय करणार आहेत. लोकहितासाठी या सर्व बांधकामांची जबाबदारी महापालिका प्रशासन घेणार आहे. त्यामुळे डी. डी. देसाईचे नाव काढून टाकण्यात येणार आहे. ए, बी, सी, डी आणि ई विभागातील अतिधोकादायक पुलांच्या दुरुस्तीला गुरुवारी स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली.

या पुलांची होणार दुरुस्ती -

ग्रॅन्टरोड रेल्वेवरील पूल, ऑपेरा हाऊस पूल, फ्रेंच पूल, हाजीअली भुयारी मार्ग, फॅाकलॅन्ड रोड (डायना ब्रिज), प्रिसेंस स्ट्रीट पादचारी पूल, चर्चगेट उत्तर भुयारी मार्ग, सीएसटी भुयारी मार्ग, ग्लोरिया चर्च उड्डाणपूल, सीताराम सेलम वाय ब्रीज उड्डाणपूल, ईस्टर्न फ्री वे, एसव्हीपी रोड रेल्वेवरील पूल, वाय. एम. उड्डाणपूल, सर पी डिमेलो पादचारी पूल, डॅाकयार्ड रोड पादचारी पूल, चर्चगेट दक्षिण भुयारी मार्ग

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details