मुंबई - शहरात मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. जूनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. ऑगस्ट महिन्यातील धार्मिक सणांमुळे रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली होती. मात्र १५ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या "माझे कुटुंब माझी जबाबदारी" मोहिमेला यश आले आहे. या मोहिमेमुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येत २९ टक्क्यांची घट झाली असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी १७१ दिवसांवर पोहोचल्याचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले.
माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेला मुंबईत यश आल्याचा दावा; सक्रिय रुग्णांच्या संख्येत २९ टक्क्यांची घट - Iqbal Singh Chahal on my family my responsibility campaign
माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला मुंबईत यश मिळत आहे. या मोहिमेतून करण्यात आलेल्या जनजागृती आणि तपासणीमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत २९ टक्क्यांनी घट झाली आहे. तर रुग्ण दुप्पटीचा कालावधी देखील १७१ दिवसांवर पोहोचला आहे.
मुंबईत मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. एप्रिल मे महिन्यात रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली. जूनपासून ही रुग्ण संख्या कमी होत असतानाच ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणांमुळे पुन्हा रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली. मात्र पालिकेकडून राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी यामुळे कोरोना रुग्ण आढळून येणाऱ्या सिल इमारतीच्या प्रमाणात ३० टक्क्यांची तर कंटेनमेंट झोनच्या संख्येत १३ टक्क्यांची घट झाल्याचे आयुक्तांनी सांगितले.
रुग्णांची संख्या कमी, बेड रिक्त -
कोरोनाचे नवे रुग्ण आढळून यायचे प्रमाण १.०६ टक्क्यांवरून ०.४१ टक्के इतके घसरले आहे. रुग्ण दुप्पटीचा कालावधी ६६ दिवसांवरून १७१ वर पोहोचला आहे. ऑक्टोबर महिन्यातील शहरातील मृत्यू दर २.५ टक्के इतका होता. यामुळे शहरातील मृत्यू दर ४.४ टक्क्यांवरून ३.९ टक्के इतका झाला आहे. रुग्ण संख्या कमी झाल्याने रुग्णालयातील कोव्हिड बेडही रिक्त राहत आहेत. आधी ४ हजार ९८६ बेड रिक्त राहत होते. त्यात वाढ होऊन ७ हजार ८१७ इतके बेड रिक्त राहत आहेत. आयसीयूमध्येही २२५ बेड रिक्त राहत होते त्यात वाढ होऊन ५६१ बेड रिक्त राहू लागले आहेत. शहरात ऑगस्ट महिन्यात दरदिवशी ६ हजार ५०० कोव्हिडच्या चाचण्या होत होत्या. चाचण्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली असून दररोज १४ ते १६ हजार चाचण्या केल्या जात आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्क्यांवरून ८९ टक्के इतके पोहोचले आहे. खासगी रुग्णालयात गंभीर आजारी असलेल्या रुग्णांची संख्या २४ टक्क्यांनी कमी झाल्याचे आयुक्तांनी सांगितले.
नागरिकांमध्ये जनजागृती -
माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेअंतर्गत शहरातील ३५.२ लाख कुटुंबांपैकी ३४.९ लाख कुटुंबांना पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. या भेटी दरम्यान मास्कचा वापर करा, हात वारंवार स्वच्छ करा, फिजिकल डिस्टनसिंगचे पालन करा, सॅनिटायझरचा वापर करा आदी सूचना पालिकेने संबंधितांना दिल्या आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पालिकेने ७३८ होर्डिंग मोफत लावले आहेत. बेस्टच्या ३ हजार १०० बसवर तर १ हजार ७५० बस थांब्यावर तसेच कार्यालय आणि दुकानांच्या ठिकाणी २० लाख 'नो मास्क नो एन्ट्री'चे बॅनर, स्टिकर लावण्यात आले आहेत. मास्क न लावणाऱ्या १.५० लाख तर रस्त्यावर थुंकणाऱ्या व घाण करणाऱ्या ५ लाख नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.