मुंबई - दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते. पाणी साचल्याने वाहतूक ठप्प होते, नागरिकांच्या घरात पाणी जाते आणि यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतो. यंदाच्या पावसाळ्यात शहर व उपनगरात पाणी साचून मुंबईची तुंबई होणार नाही, यासाठी सर्व प्राधिरणांनी एकमेकांशी समन्वय साधून आवश्यक ती उपाययोजना व पूर्वतयारी करावी, असे आदेश पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिले आहेत.
कोविड नियमांचे पालन करा -
पावसाळापूर्व कामांबाबत पालिका आयुक्तांनी एक आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या व करण्यात येणाऱ्या पूर्व-तयारीचा आढावा घेतला. सर्व यंत्रणांनी आपापसात समन्वय साधण्याच्यादृष्टीने अधिकाधिक सूक्ष्मस्तरीय नियोजन करावे. पावसाळा पूर्व-तयारीच्या अनुषंगाने कार्यवाही करताना कोविड विषयक सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे करावे, असे आदेश आयुक्तांनी यावेळी उपस्थित सर्व प्राधिकरणांना दिले.
नालेसफाईची पाहणी होणार -
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक प्रभावीपणे व्हावा, यादृष्टीने महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी नाले-सफाईची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. यासोबतच रेल्वे हद्दीमध्ये देखील रेल्वे प्रशासनाद्वारे व महापालिकेच्या आर्थिक सहकार्यातून नालेसफाईची कामे करण्यात येत आहेत. या नालेसफाई कामांचा आढावा बैठकी दरम्यान घेण्यात आला. या अनुषंगाने लवकरच पाहणी दौऱ्यांचे आयोजन करण्यात येत असल्याचीही माहिती बैठकी दरम्यान देण्यात आली.
मुंबईची तुंबई नको -
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात काही सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडतात. त्यामुळे रेल्वे व रस्ते वाहतुकीवर, जनजीवनावर त्याचा विपरीत होणारा परिणाम लक्षात घेता, यंदा पावसाळ्यात कुठेही पाणी साचून मुंबईची तुंबई होणार नाही, याची दक्षता घ्यावी आणि त्यासाठी प्रत्येक प्राधिकरणाने सूक्ष्म नियोजन करावे, असे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले. मुंबईत अनेक ठिकाणी सध्या मुंबई मेट्रोची कामे प्रगतीपथावर आहेत. या अनुषंगाने या बांधकामातून निघणारा कचरा, डेब्रीस वेळच्यावेळी हलवावे. या कामांमुळे पावसाळ्या दरम्यान कुठेही पाणी साचणार नाही, याची काटेकोर काळजी मुंबई मेट्रो प्रशासनाने घ्यावी, असे आदेशही आयुक्तांनी दिले. तसेच विद्युत वितरण व्यवस्थेचे आवश्यक ते ऑडिट करवून घ्यावे, अशी सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी केली.
धोकादायक इमारती खाली करा -
मुंबई महापालिका क्षेत्रात म्हाडाच्या आणि काही खासगी जुन्या इमारती आहेत. पावसाळ्यात या धोकादायक इमारती कोसळून जीवित व वित्तीय हानी होण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. त्यामुळे आगामी पावसाळ्यात इमारत दुर्घटना घडून जीवित व वित्तीय हानी होऊ नये यासाठी, या धोकादायक इमारती पावसाळ्यापूर्वीच रिकाम्या करून घेणे गरजेचे आहे. या अनुषंगाने म्हाडा प्रशासनाने पोलीस दलाचे सहकार्य घ्यावे, अशी सूचना महापालिका आयुक्तांनी बैठकीत केली.
विविध प्राधिकरणाची उपस्थिती -
या बैठकीला मध्य व पश्चिम रेल्वे, भारतीय नौसेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद प्राधिकरण, भारतीय हवामान खाते, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, म्हाडा, मुंबई मेट्रो, राज्य शासनाचे सार्वजनिक बांधकाम खाते, बेस्ट, विविध विद्युत वितरण कंपन्यांच्या प्रतिनिधींसह विविध संस्थांचे प्रमुख, प्रतिनिधी उपस्थित होते.
हेही वाचा -अनिल देशमुखांना सीबीआयचे समन्स, गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी व्हावे लागेल हजर