महाराष्ट्र

maharashtra

पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडून कोरोना संदर्भातील नियम धाब्यावर, मास्क ना लावता पाहणी दौरा

By

Published : Dec 4, 2020, 11:58 AM IST

महिनाभरापूर्वी जयस्वाल यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर मात करून आल्यावर महापौरांनी दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या भोजनाच्या कार्यक्रमात जयस्वाल यांना मास्क न लावता वावरताना उपस्थितांनी पाहिले होते. त्यानंतर आता जयस्वाल यांना मास्क न लावता गर्दीमध्ये चैत्यभूमीवरील तयारीची पाहणी करताना नागरिकांनी पाहिले आहे. मास्क लावला नाही तर, नागरिकांकडून दंड वसूल केला जातो. मग अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

बीएमसी अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल न्यूज
बीएमसी अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल न्यूज

मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सार्वजनिक ठिकाणी फिरताना फेस मास्क लावण्याचे, सोशल डिस्टन्सिंगचे आवाहन करण्यात येते. मास्क लावला नाहीतर दंडात्मक कारवाईही करण्यात येते. मात्र, ही कारवाई करणाऱ्या महापालिका प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी असलेले आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांनी मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी पाहणी दौरा केला. यामुळे कोरोना संदर्भातील नियम फक्त नागरिकांसाठीच आहेत का? पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांना मास्क ना लावता फिरण्याची परवानगी आहे का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

जयस्वाल यांच्याकडून नियम धाब्यावर -

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमी येथे करण्यात आलेल्या तयारीसह थेट प्रक्षेपण व्यवस्थेची अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल आणि सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी काल गुरुवारी (३ डिसेंबर) पाहणी केली. अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, पालिका उपायुक्त (परिमंडळ २) विजय बालमवार, प्रसारभारतीचे डॉ. अश्विनी कुमार, पोलीस उपायुक्त प्रणय अशोक, पालिका माहिती तंत्रज्ञान खात्याचे संचालक तथा सहाय्यक आयुक्त शरद उघडे, जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी संजीव जयस्वाल वगळता सर्व अधिकाऱ्यांनी मास्क लावून राज्य सरकार आणि पालिकेच्या नियमांचे पालन केल्याचे दिसून आले.

बीएमसी अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल मास्कशिवाय दादर चैत्यभूमीवर
अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही -

विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी जयस्वाल यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर मात करून आल्यावर महापौरांनी दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या भोजनाच्या कार्यक्रमात जयस्वाल यांना मास्क न लावता वावरताना उपस्थितांनी पाहिले होते. त्यानंतर आता जयस्वाल यांना मास्क न लावता गर्दीमध्ये चैत्यभूमीवरील तयारीची पाहणी करताना नागरिकांनी पाहिले आहे. मास्क लावला नाही तर, नागरिकांकडून दंड वसूल केला जातो. असे असताना पालिकेचे कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी मात्र मास्क लावत नसतील तर या अधिकाऱ्यांवर दंडात्मक आणि साथ नियंत्रण कायद्यानुसार कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न मुंबईकरांकडून विचारला जात आहे.

बीएमसी अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल मास्कशिवाय दादर चैत्यभूमीवर
४ लाख नागरिकांवर कारवाई, १० कोटींचा दंड वसूल -

मुंबईत कोरोनाचे संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेकडून नागरिकांच्या हितासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी तोंडावर मास्क लावणे सक्तीचे केले आहे. सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर २०० रुपयांचा दंड ठोठवण्याचे आदेश आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले. या संदर्भातील परिपत्रक १४ ऑक्टोबर २०२० ला जारी करण्यात आले. २४ प्रभागात कारवाईसाठी पथके नेमण्यात आली. पर्यवेक्षक, कनिष्ठ अवेक्षक, मुकादम, उपद्रव शोधक आदी ५०० कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. सुमारे २ हजार १६० क्लिन-अप मार्शल २४ वॉर्डात नेमण्यात आले. आतापर्यंत ४ लाख ८५ हजार लोकांवर पालिकेने कारवाई केली. त्यांच्याकडून १० कोटी ७ लाखाचा दंड वसूल केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details