मुंबईBMC action to control pollution: महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी 25 ऑक्टोबरला प्रदूषण रोखण्यासाठी 27 मुद्द्यांसह मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. त्यात बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण रोखण्यासाठी 15 दिवसांच्या आत स्प्रिंकलर आणि 30 दिवसांच्या आत स्मॉग गन बसवणे बंधनकारक असल्याचं सांगण्यात आलं. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, या आठवड्यापासून साइटवर स्मॉग गन बसवणे बंधनकारक असेल. बीएमसीचे पथक त्याची चौकशी करणार आहे. 15 दिवसांची मुदत संपली आहे. यानंतर बीएमसी घटनास्थळांना भेट देऊन कारवाई तीव्र करेल.
विकासकामे थांबवण्याच्या नोटिसा -मुंबई महानगरातील प्रदूषणाची वाढती पातळी नियंत्रित करण्यासाठी बीएमसी अनेक पावले उचलत आहे. यामध्ये मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करणाऱ्या बांधकाम स्थळांना तसंच विकासकामांना काम थांबवण्याच्या नोटीसा देण्यात येत आहेत. बीएमसीने आतापर्यंत मुंबईतील 278 बांधकामे आणि विकासकामे थांबवण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. दिवाळीनंतर प्रदूषण नियंत्रणासाठी स्थापन करण्यात आलेल्या पथकाची कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचं पालिका प्रशासनानं सांगितलं आहे.
6000 हून अधिक बांधकाम साइट्स -BMC ने सांताक्रूझ, खार आणि वांद्रे भागांसह मालाड, मुलुंड, कांदिवली येथील 62 हून अधिक बांधकाम साइट्स आणि RMC प्लांट्सवर काम थांबवण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 6000 हून अधिक बांधकाम साइट्स आहेत. यापैकी बीएमसीच्या पथकांनी आतापर्यंत जवळपास 90 टक्के साइट्सना भेटी दिल्या आहेत. 190 बांधकाम आणि विकासकामांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करावं -यातील काही बांधकामांना २४ तासांच्या आत मार्गदर्शक तत्त्वांचं पालन का केलं नाही? याची कारणं दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, 24 तासांच्या आत मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करावं, असं सांगण्यात आलं आहे. या अंतर्गत पालिकेनं आतापर्यंत 2900हून अधिक नोटिसा बजावल्या आहेत. त्याचबरोबर 278 जणांना काम थांबवण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.