पुणे: विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केलेल्या चौकशीतच या शाळेकडे बोगस मान्यता प्रमाणपत्र असल्याचे आढळून आले आहे. त्यावेळेसचे शिक्षण उपसंचालक आहिरे यांच्या स्वाक्षरीचे पत्र या शाळेकडे आढळून आले आहे; परंतु या पत्राचा आवक जावक क्रमांक शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे उपलब्ध नाही. धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित शाळेकडे असणाऱ्या मान्यता पत्रावरील आहिरे यांची स्वाक्षरी बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे.
शाळेविरुद्ध अहवाल सादर: प्राप्त माहितीनुसार ब्ल्यू बेल्स ही स्वयंम अर्थसाहित शाळा असून २०१९ मध्ये ही शाळा सुरू झाली. इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे वर्ग शाळेत सुरू आहेत. या शाळेकडे उपलब्ध असणारे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांचे मान्यता प्रमाणपत्र बोगस आहे. पत्रावरील आहिरे यांची स्वाक्षरी बनावट असल्याची खातरजमा केली आहे. या सर्व बाबी विचारात घेत राज्य शासनाचे मान्यता प्रमाणपत्र खरे आहे की खोटे, याबाबतची माहिती तपासावी लागणार आहे. शाळेकडे बोगस मान्यता प्रमाणपत्र असल्याचा अहवाल राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांना सादर करण्यात आला आहे.
शाळेचा खुलासा: अगोदरच दहशतवादी संघटनेच्या लोकांकडून या शाळेच्या दोन मजल्याचा वापर केल्याने या शाळेवर टीका होत आहे. परंतु या शाळेचा आणि त्या मजल्याचा काही संबंध नाही, असा खुलासासुद्धा शाळेने केला होता. मात्र आता हा नवीनच माहिती उघड झाल्याने या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे तर नुकसान होणारच आहे. परंतु या विद्यार्थ्यांची जबाबदारी कोण घेणार आणि अशा शाळेमुळे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा होणारा त्रास यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.