महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सायन रुग्णालयात रक्ताचा काळाबाजार; थॅलेसेमिया रुग्णांकडून अतिरिक्त पैशांची मागणी

थॅलेसेमिया झालेल्या रुग्णांना रक्त मिळत नसून वॉर्डबॉय अतिरिक्त पैसे घेऊन रक्त विकत असल्याचा धक्कादाय प्रकार मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात घडला आहे.

black marketing of blood in sian hospital in mumbai
सायन रुग्णालयात रक्ताचा काळाबाजार; थॅलेसेमिया रुग्णांनांकडून अतिरिक्त पैशांची मागणी

By

Published : Oct 14, 2020, 11:10 AM IST

मुंबई -मुंबईत थॅलेसेमिया झालेल्या रुग्णांना एकीकडे रक्त मिळत नाही. रक्त मिळत नाही म्हणून त्या रुग्णाचे पालक नातेवाईक पालिकेच्या रुग्णालयात रक्ताची विचारणा करतात. रक्त नाही असे सांगितले जाते. मात्र नंतर एखादा वॉर्डबॉय पुढे येतो आणि अतिरिक्त पैसे घेऊन रक्त विकतो. असा प्रकार मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात उघड झाला आहे. रक्ताचा काळाबाजार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

थॅलसेमिया झालेल्या रुग्णाचा शरीरात रक्त तयार होत नाही. त्यांना दर १५ दिवसांनी रक्ताची गरज भासते. अशा रुग्णांना १५ दिवसांनी शरीरात रक्त चढवावे लागते. मुंबई महापालिकेच्या सायन म्हणजेच लोकमान्य टिळक रुग्णालयातही थॅलसेमियाग्रस्त असलेले १० ते २० वयोगटातील रुग्ण आहेत. त्यांना दोन ते तीन दिवसांत रक्ताची गरज भासणार होती. परंतू रुग्णालयात रक्त नसल्याचे सांगण्यात आले. म्हणून या रुग्णांचा पालकाकडून रक्ताची शोधाशोध केली जात होती. रक्त मिळाले नाही, तर आपल्या मुलाचा मृत्यू होईल, अशी भीती या पालकांना होती. रक्ताची शोधाशोध सुरू असतानाच एक वॉर्ड बॉय समोर येऊन पैशांची मागणी करतो. जे रक्त रक्तपेढीत नाही असे सांगितले जाते तेच रक्त वॉर्डबॉय अतिरिक्त पैसे घेऊन उपलब्ध करून देतो. नाईलाज म्हणून पालकही हे पैसे देऊन रक्त विकत घेतात. पालिकेच्या सायन रुग्णालयाच्या थॅलेसेमिया सेंटरमधील वॉर्डबॉय या रक्ताची विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. दरम्यान रक्तपेढीत रक्त नसल्याचे सांगितल्यानंतर या वॉर्डबॉयकडे ते कुठून येते, असा प्रश्न उपस्थित होतो.

शस्त्रक्रिया करण्यासाठी जे रक्त लागते, ते रक्तपेढीतून दिले जाते. थॅलेसेमियाच्या रुग्णांना रक्त देताना रक्तगटासह इतर बाबींही तपासून पाहाव्या लागतात. त्यामुळे हे रक्त शस्त्रक्रियेच्या नावावर देऊन ते वापरात न आल्यास पुन्हा रक्तपेढीमध्ये जमा होणे अपेक्षित असते. हे रक्त या थॅलेसेमियाच्या रुग्णांसाठी विकले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रक्तपेढीमधील कोण तंत्रज्ञ यामध्ये सहभागी आहे, याचीही कसून चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. अपघात झालेल्या रुग्णाला रक्ताची गरज भासू शकते, यासाठी आपत्कालीन वैद्यकीय स्थितीत थोडे रक्त राखून ठेवले जाते. त्याचा वापरही मागील किती दिवसांमध्ये किती प्रमाणात झाला आहे, ते नेमके कोणाला देण्यात आले याचीही चौकशी करावी, अशीही मागणी होत आहे. दरम्यान याबाबत रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकलेला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details