मुंबई - राजधानी मुंबईत कोरोनाचा प्रसार होत असताना धारावी, वरळी हे हॉटस्पॉट ठरले होते. मात्र आता मुंबईतील कॉर्पोरेट हब असलेले वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच बीकेसी हे कोव्हिड-१९ चे नवीन हॉटस्पॉट ठरत आहे. बीकेसीमध्ये काम करणारे सुमारे ६० जण महिनाभरात पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईत सध्या ज्या विभागात कोरोनाचा प्रसार होत आहे, त्या डी विभागातील हे कर्मचारी असल्याने पालिकेने त्याकडे आता विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
कॉर्पोरेट हब असलेले बीकेसी कोरोनाचे नवे हॉटस्पॉट, महिनाभरात ६० पॉझिटिव्ह - बीकेसीमध्ये कोरोनाचा शिरकाव
मुंबईतील कॉर्पोरेट हब असलेले वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच बीकेसी हे कोव्हिड-१९ चे नवीन हॉटस्पॉट ठरत आहे. बीकेसीमध्ये काम करणारे सुमारे ६० जण महिनाभरात पॉझिटिव्ह आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ज्यांच्यात लक्षणे आढळून येतात आणि जे हाय रिस्क संपर्कात आहेत, त्यांच्यासाठी अँटिजेन टेस्ट करण्यात येणार आहेत. या टेस्टमुळे घरी जाण्यापूर्वी ते पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहेत याबाबतचा रिपोर्ट त्यांना कामाचे ठिकाण सोडण्यापूर्वी कळेल आणि इतरांना कोरोनाचा संसर्ग होण्यापासून बचाव होईल
मुंबईत मार्च पासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला. या दरम्यान धारावी आणि वरळीमधील झोपडपट्टी विभाग हॉटस्पॉट बनले होते. पालिकेने परिश्रमाने या विभागातील कोरोनाचा प्रसार रोखला आहे. मुंबईत कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला असताना अंधेरी ते दहिसर, भांडुप मुलुंड तसेच ग्रॅंट रोड आदी भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. शहरात लॉकडाऊनमधून शिथिलता दिल्यावर नोकरी व कामासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडले आहेत. यादरम्यान एकमेकांच्या संपर्कात आल्याने कोरोनाचा प्रसार होऊ लागला आहे.