मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिकेच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन करण्यात आले. या सर्व प्रकल्पांचा थेट फायदा सर्वसामान्य मुंबईकरांना होणार आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेचा यावेळी पराभव करण्याची तयारी भाजपने केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाकडून रणशिंग फुंकण्यात आले आहे. मुंबईत भारतीय जनता पक्षाची सत्ता आणून ठाकरे गटाला अजून एक मोठा धक्का देण्याची तयारी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नुकताच झालेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठीच होता असा आरोप या दौऱ्याच्या आधीपासूनच ठाकरे गट तसेच विरोधी पक्षाकडून सुरू आहे. पण मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी मिशन 150 ची सुरुवात भारतीय जनता पक्षाने केली आहे.
महापालिकेसाठी भाजपची रणनीती ठरली -कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीत मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवायची तयारी भारतीय जनता पक्षाकडून सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आपली रणनीती ठरवली असल्याचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईवर भारतीय जनता पक्षाची सत्ता यावी यासाठी खुद्द गृहमंत्री अमित शहा यांनी कंबर कसली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत विजय किती महत्त्वाचा आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः आपल्या सभेतून जाहीर केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकण्यासाठी मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
उत्तर भारतीय मते वळवण्यासाठी पयत्न - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची सर्वात मोठी जबाबदारी प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आलेली आहे. गेल्या वर्षभरापासूनच मुंबईत भारतीय जनता पक्षाची ताकद कुठे कमी आहे. त्या ठिकाणी ताकत वाढवण्याचे काम सुरू करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आशिष शेलार यांच्यासह आमदार प्रसाद लाड आमदार, अतुल भातखळकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार पराग अळवणी, खासदार मनोज कोटक, खासदार गोपाळ शेट्टी आमदार अमित साटम, आमदार राम कदम, आमदार योगेश सागर, आमदार श्रीकांत भारतीय या आमदारांकडे विशेष जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. तसेच उत्तर भारतीय मते जास्तीत जास्त आपल्याला मिळावीत यासाठी काँग्रेसमधून आलेले कृपाशंकर सिंह यांनाही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात भारतीय जनता पक्षाकडून पॉकेट्स तयार करण्यात आलेले आहेत. सहा पॉकेट्समध्ये आमदारांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटून देण्यात आलेल्या आहेत.
काँग्रेस नगरसेवकांच्या जागांवर लक्ष -गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला 29 जागांवर आपले नगरसेवक निवडून आणता आले होते. भारतीय जनता पक्षाने आता या 29 जागांवर लक्ष केंद्रित केला आहे. शिवसेनेचे बळ ज्या वार्डामध्ये अधिक आहे. तिथे आपला उमेदवार निवडून आणण्यापेक्षा काँग्रेस नगरसेवक असलेल्या वार्डातून उमेदवार निवडून आणणं अधिक सोपं जाईल हे भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे काँग्रेस नगरसेवक असलेल्या वार्डात भारतीय जनता पक्ष संपूर्ण ताकद लावणार आहे.