मुंबई : राज्यात शिवसेनेच्या चाळीस आमदारांना फोडून भाजपने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. महाराष्ट्रातून ठाकरेंचे राजकीय अस्तित्व संपेल असा अंदाज यामागे बांधण्यात आला. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात ठाकरेंची क्रेझ कायम असल्याने भाजपने शिंदेंच्या आडून राबवलेले मिशन ठाकरे सपशेल फेल ठरले आहे. आगामी निवडणुकीत याचा फटका बसेल या भीतीने आता भाजपने आता प्लॅन बी तयार केला आहे. लोकसभा आणि विधानसभासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित घेण्याची हालचाली सुरू केल्या आहेत. केंद्रीय नेतृत्वाला तसा प्रस्ताव पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भाजपवरच प्लॅन बुमरँग:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत गेल्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा सोडला असे वातावरण तयार करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हाताशी धरत भाजपने ठाकरेंचे चाळीस आमदार गळाला लावले. इतकेच नव्हे तर १३ खासदारांनी देखील ठाकरे यांची साथ सोडत शिंदे यांना पाठिंबा दिला. राज्यातील बहुतांश माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचे वाट धरली. मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंना सोडल्यामुळे महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी पक्ष असलेल्या दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्व संपेल असा कयास लावला. मिशन ठाकरे हा प्लॅन भाजपवर बुमरँग झाल्याचे बोलले जाते.
केंद्राला पाठवलं पत्र:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अवघ्या देशातील नागरिकांच्या मनावर गारुड आहे. मोदींमुळे भाजपला लोकसभा असो किंवा विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळत आले आहे. ठाकरेंचे राजकीय अस्तित्व आणि नामोनिशान मिटवण्यासाठी केलेल्या कारनाम्यामुळे महाराष्ट्रात भाजप विरोधात प्रचंड नाराजीची लाट आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी प्रगत आणि पुरोगामी महाराष्ट्रात घेतलेली भूमिका जनतेच्या आजही पचनी पडलेली नाही. उलट शिंदेंसेनेवेर गद्दारीचा शिक्का बसला आहे. तर पक्ष संपवायला निघालेल्या भाजप विरोधात जनतेमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहेत. अशातच महाविकास आघाडी असल्याने आगामी निवडणूक जड जाईल, अशी भीती भाजपला आहे. केंद्रातील नेतृत्वाला महाराष्ट्र भाजपने पत्रव्यवहार करत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा प्रस्ताव पाठवला असल्याचे समजते.