मुंबई- विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. त्यात राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते भाजपच्या गळाला लागले. त्यामुळे राष्ट्रवादीची दयनीय अवस्था निर्माण झाली होती. मात्र शरद पवारांनी राज्यात झंझावती दौरे करून राष्ट्रवादी अजून मजबूत असल्याचे दाखवून दिले होते. दरम्यान, आता सर्वच पक्षांनी तिकीट वाटप सुरू केले आहे. त्यामुळे आता सर्वच पक्षातून नाराजी नाट्याचा अंक सुरू झाला आहे. सुरुवातीला आऊट गोईंचा फटका बसलेल्या राष्ट्रवादीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. राष्ट्रवादीमध्ये आजही काही दिग्गज नेत्यांचा प्रवेश होणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट वाटप सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू झाले आहे. आज नाशिकमधील मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. राहुल ढिकले हे माजी खासदार उत्तमराव ढिकले यांचे चिरंजीव आहेत. ढिकले हे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून ईच्छूक आहेत. याचबरोबर भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी देखील राष्ट्रवादीची वाट धरली आहे. ते आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. ते सिन्नर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी ईच्छूक आहेत. त्यांनी २०१४ मध्ये भाजपातून निवडणूक लढवली होती. मात्र शिवसेना उमेदावरा वाजे यांनी त्यांचा पराभव क ेला होता.