मुंबई -भारतीय जनता पक्षाने नुकतेच देशातील लोकसभा मतदारसंघाचे अंतर्गत सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणानंतर समोर आलेले निष्कर्ष पाहता भाजपाचे धाबे दणाणले आहे. सुमारे 144 जागा कमकुवत वाटत असतानाच हा आकडा आता 170 पर्यंत गेला आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह अन्य महत्त्वाच्या नेत्यांनी या जागा मजबूत करण्यासाठी दौरे सुरू केले आहे.
भाजपने कसली कंबर -विरोधी पक्षांनी आपली मूठ बांधून भाजपला नामोहरम करण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केल्याने भाजपानेही आता कमजोर जागा ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघांवर भाजपाने काम करायला सुरुवात केली आहे. यासाठी लोकसभा मतदारसंघ निवडले गेले आहेत. ज्यात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला दुसऱ्या क्रमांकावर राहत पराभवाचा सामना करावा लागला होता. किंवा असे लोकसभा मतदारसंघ जिथे स्थानिक आघाडीमुळे भाजप आजवर निवडणूक लढली नाही, अशा मतदारसंघांची निवड करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातल्या 18 लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
कोणत्या मतदारसंघांवर भाजपाचे लक्ष्य ? राज्यातील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या १८ मतदारसंघांवर भाजपाची नजर आहे. हे मतदारसंघ अधिक मजबूत करण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. यामध्ये दक्षिण मध्य मुंबई, मध्य मुंबई, पालघर, कल्याण, चंद्रपूर, औरंगाबाद, शिरूर, शिर्डी, बारामती, सातारा, हातकणंगले, हिंगोली, म्हाडा, बुलढाणा, धाराशिव , कोल्हापूर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड या मतदारसंघांचा समावेश असणार आहे. चार मतदारसंघांचे एक क्लस्टर राज्यात भाजपाने कमकुवत असलेल्य़ा१८ लोकसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्रात पाच क्लस्टर तयार केले आहेत. या क्लस्टरची जबाबदारी पाच केंद्रीय मंत्र्यांवर दिली आहे.
कोणत्या मतदारसंघाची कोणत्या मंत्र्यांवर जाबाबदारी ? केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्याकडे शिरूर, शिर्डी, बारामती आणि रायगड या चार लोकसभा मतदारसंघाचे जबाबदारी देण्यात आली. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे दक्षिण मध्य मुंबई, मध्य मुंबई, पालघर, कल्याण हे चार लोकसभा मतदारसंघ सोपवण्यात आले आहेत. तर, केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांच्याकडे रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सातारा, म्हाडा, धाराशिव या चार लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे हातकणंगले, कोल्हापूर या दोन लोकसभा मतदारसंघाचे जबाबदारी देण्यात आली असून या मतदारसंघामध्ये काम सुरू आहे.
सभा घेण्यास सुरूवात - गेल्या लोकसभेमध्ये भाजपचा पराभव झालेले लोकसभा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाच्या गटात असलेले लोकसभा मतदारसंघामध्ये या मंत्र्यांनी सभा घेण्यासही सुरूवात केली आहे. या मिशन अंतर्गत लोकसभा मतदारसंघात पक्षाची बांधणी मजबूत करणे, केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संपर्क साधने, त्यांची शिबिरं घेणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा प्रचार प्रसार करणे हे कार्य प्रामुख्याने २०२४ च्या निवडणुकीपर्यंत चालणार आहे.
प्रत्येक क्लस्टरमध्ये पंतप्रधानांची सभा - विजय संकल्प सभेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रत्येक क्लस्टर मध्ये एक सभा तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रमुख नेत्यांच्या प्रत्येक लोकसभा मतदार संघात एक सभा यानुसार भारतीय जनता पक्षाने मिशन संकल्प सभांचे नियोजन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच सभा या नियोजनानूसार होणार आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येक लोकसभा संघात प्रत्येकी एक - एक सभा होणार आहे.
हेही वाचा - Teacher Graduate Election : महाविकास आघाडीला भाजपसोबत बंडखोरांचे आव्हान; नाशिक, औरंगाबादमध्ये डोकेदुखी वाढणार