मुंबई - दूध उत्पादकांच्या दुधाला दरवाढ मिळावी यासाठी भाजपा आणि मित्रपक्षांनी राज्यव्यापी दूध आंदोलनाला सुरुवात केली आहे. गाईच्या दुधाला प्रति लिटर 10 रुपये अनुदान द्यावे, दूध भुकटी निर्यातीसाठी प्रति किलो 50 रुपये अनुदान मिळावे आणि दुध खरेदीचा दर 30 रुपये करावा, या मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे. मुंबईत गोरेगाव पूर्व येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील 'महानंद डेअरी'च्याबाहेर मुंबई भाजपाच्या व आरपीआयवतीने आंदोलन करण्यात आले.
दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुंबई भाजपाचे महानंदसमोर आंदोलन - भाजपा दूध आंदोलन न्यूज
दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी भाजपा व मित्र पक्षांकडून राज्यव्यापी दूध आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईत गोरेगाव पूर्व येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील 'महानंद डेअरी'च्याबाहेर मुंबई भाजपाच्या व आरपीआयवतीने आंदोलन करण्यात आले.
मुंबईतील दूध आंदोलन मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलनात विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राज्य सरकारने लवकरात लवकर दूधाबाबतच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात. नाहीत तर शेतकऱ्यांच्या पाठीशी असणारे सर्व मुंबईकर महानंदवर धडकतील, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला.
मागील काही दिवसांपासून राज्यात दूध दरवाढीची मागणी जोर धरू लागली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काही दिवसांपूर्वी राज्यात दूध दरवाढीसाठी आंदोलन केले होते. भाजपानेही नागपंचमीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दूध पाठवले होते. त्यांनतरही दूध प्रश्नी तोडगा न निघाल्याने आज पुन्हा भाजपा व मित्र पक्षांकडून राज्यभर दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात येत आहे.