मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भोपाळ येथून "मेरा बूथ सबसे मजबूत" या कार्यक्रमाअंतर्गत देशातील १० लाख बूथ वरील कार्यकर्त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले. या निमित्ताने मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मोदी सरकारच्या ‘गरीब कल्याण’ कार्यक्रमातून गरीबांचे उंचावलेले जीवनमान, सर्वसमावेशक विकासामुळे जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी भारताची अर्थव्यवस्था याची माहिती भाजपा कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी सामान्य माणसांपर्यंत घरोघरी जाऊन पोहचविली पाहिजे. पक्षाच्या घर चलो अभियानात आपण स्वतः ५०० घरी जाणार असून प्रत्येक नेत्याने घर चलो अभियानात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
जनतेशी संवाद साधण्याची उत्तम संधी - याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना फडणवीस म्हणाले की, मोदी सरकारच्या ९ व्या वर्षपूर्तीनिमित्त आखलेल्या उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘मेरा बूथ सबसे मजबूत‘ या अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच वेळी १० लाख बूथवरील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत एक इतिहास रचला आहे. मोदी सरकारची ९ वी वर्षपूर्ती जनतेशी संवाद साधण्याची उत्तम संधी असल्याची पक्षाची भूमिका आहे. उत्तरदायित्वाच्या भावनेतून मोदी सरकारने राबविलेल्या लोकोपयोगी योजनांची माहिती जनसंवादाच्या माध्यमातून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न पक्षाचे कार्यकर्ते करीत आहेत .