मुंबई - भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये लोकसभेसाठी जागावाटप झाले आहे. यात आठवलेंच्या पक्षासह इतर कुठल्याच छोट्या मित्रपक्षाला स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे रामदास आठवलेंनी माध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली होती. पण, महायुती होईलच असा विश्वास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच, आठवलेंशी चर्चा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे.
महायुती होईलच, मुनगंटीवारांना विश्वास; आठवलेंशी चर्चा करण्याची भाजपची तयारी - आरपीआय
शिवसेना आणि भाजपने युतीच्या चर्चेत आपल्याला सामील करुन घेतले नाही, अशी रामदास आठवलेंची तक्रार आहे.
मुनगंटीवार म्हणाले, की ज्या पक्षांनी २०१४ मध्ये भाजपला साथ दिली त्यांचा सन्मान करण्यात येईल. सर्व घटक पक्षांसह महायुती होईल. या युतीच्या जोरावर आम्ही विरोधकांना पुन्हा एकदा धोबीपछाड देऊ, असे मुनगंटीवारांनी सांगितले. युतीच्या घोषणेनंतर आज वर्षा बंगल्यावर युतीच्या नेत्यांसाठी भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. जेवणाचे पदार्थ तिखट आहेत, की गोड हे माहित नाही. पण, शेवट नक्की गोड असणार अशी सूचक टिपण्णी यावेळी मुनगंटीवार यांनी केली.
बजेटबाबत माहिती देताना ते म्हणाले, २७ फेब्रुवारीला सादर करण्यात येणारा अर्थसंकल्प अंतरिम आहे. यामुळे जूनमध्ये पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. जूनच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना न्याय देऊ. शेतीचा व्यवसाय हा मजबुरीचा नाही मजबुतीचा व्यवसाय आहे, असे शेतकऱ्यांना वाटले पाहिजे असे मुनगंटीवार म्हणाले.