मुंबई - विधान परिषदेच्या कामाकाजात आम्हाला न्याय मिळत नसल्याचा दावा करत मंगळवारी सत्ताधारी पक्षाकडून विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर थेट अविश्वासाचा ठराव आणण्याचा इशारा दिला. भाजपचे ज्येष्ठ नेते व सभाग्रह नेते चंद्रकांत पाटील यांनी हा इशारा दिल्याने सभाग्रहात एकच गोंधळ उडाला.
अर्थ राज्यमंत्री दिपक केसरकर सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन करत असतानाच विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात उठून वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्वीटरवर अर्थसंकल्प फुटला असल्याचे सांगितले. माहिती समाजमाध्यमातून बाहेर आली असल्याने राज्याचा अर्थसंकल्प फुटला आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प फुटला असून हा सभागृहाचा अवमान असल्याचे सांगत सभागृहात सरकारने माफी मागावी, अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
सभापतींनी नेमका प्रकार काय आहे, याची माहिती घेण्यासाठी तातडीने गटनेत्यांची बैठक घेण्यात येईल, असे सांगत सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी थांबवत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे वित्त राज्यमंत्री दिपक केसरकर यांना आपले अर्थसंकल्पावरील भाषण थांबवावे लागले. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरु होताच सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी जो काही प्रकार झालेला आहे, त्याचा या सभागृहाशी संबंध नसल्याचा दावा करत कोणीतरी सांगितले म्हणून सभापतींनी अर्थसंकल्पीय भाषण थांबवले. इतिहासात असा प्रकार कधीही झालेला नाही, यामुळे आमचा आता सभापतींवर विश्वास राहिलेला नाही, त्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळेल असे वाटत नसल्याने आम्ही आपल्यावर अविश्वासाचा ठराव आणत असल्याचा इशारा पाटील यांनी सभागृहातच सभापतींना दिला.
दरम्यान सभापतींनी भाषण तांत्रिक बाबी काय आहेत त्या जाणुन घेण्यासाठी भाषण थांबवले. तो वेळ गटनेत्यांशी चर्चा करण्यासाठी घेतल्याचे स्पष्ट केले. माझ्यावर जो काही अविश्वासाचा ठराव आणायचा तो आणा. मात्र, आता अर्थसंकल्पाचे भाषण पूर्ण होऊ द्या, अशी सूचना सभापतींनी केली. त्यानंतर केसरकर यांनी आपले अर्धवट राहिलेले अर्थसंकल्पावरील भाषण सुरू केले.
दरम्यान, केसरकर यांनी आपल्या भाषणात धनगर समाजासाठी विविध प्रकारच्या घोषणांची माहिती देत असताना विरोधकांकडून आरक्षणाचे काय झाले ते अगोदर सांगा अशी मागणी करण्यात आली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, पीआरपी आदी सदस्यांनी सभात्याग करत सरकारचा निषेध नोंदवला.