मुंबई : Devendra Fadnavis :'महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईल', अशा आशयाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओ भाजपाकडून (BJP Maharashtra Tweet) शेअर करण्यात आला होता. त्यामुळं सध्या उपमुख्यमंत्री पदावर विराजमान असणारे देवेंद्र फडणवीस लवकरच राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार का? अशा चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात उधाण आलंय. त्यामुळे भाजपाच्या या व्हिडिओमुळं राजकीय वर्तुळात दावे प्रतिदाव्यांचा संगम सुरू झालाय.
भाजपानं पोस्ट केलेला व्हिडिओ देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतचा व्हिडिओ कोणी पब्लिश केला ते मला माहिती नाही. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. आमच्यामध्ये कोणताही बेबनाव नाही. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले तर आम्हाला ते आवडेल - प्रवीण दरेकर, भाजपा नेते
देवेंद्र फडणवीस यांनी 'मी पुन्हा येईल' असे म्हटले होते. देवेंद्र फडणवीस हेच एकनाथ शिंदे आणि आम्हाला सोबत घेऊन सत्तेत आले आहेत. जर त्यांच्या पुढाकारानेच आम्ही सरकारमध्ये काम करत असल्यानं भविष्यातील निवडणुकांमध्ये 'आम्हीच पुन्हा सत्तेत येऊ' असं त्यांना म्हणायचं असेल - उदय सामंत, मंत्री व शिंदे गटाचे नेते
व्हिडिओ केला डिलीट :भाजपाच्या सोशल मीडिया पेजवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भातला एक व्हिडिओ शेयर करण्यात आला होता. या व्हिडिओची चर्चा होताच तो सोशल मीडियावरुन काढून टाकण्यात आलाय. त्यामुळं देवेंद्र फडणवीस खरच राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री होणार का? या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही. मात्र, भाजपाच्या या व्हिडिओची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.
दोन दिवसांपूर्वी केला दिल्ली दौरा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी अचानकच दिल्ली दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून, त्यासंदर्भात ही भेट असल्याचं बोललं जात होतं. मात्र, दाराआड अनेक गोष्टी घडत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दिल्ली दौऱ्याच्या दोन दिवसांनंतर लगेच भाजपानं देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ शेयर केल्यानं राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार का?: राज्यात सध्या महायुतीचं सरकार आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच राज्याच्या मुख्यमंत्री पदी पुन्हा विराजमान होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. पण, एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदी वर्णी लागली आणि सगळ्या चर्चांना पुर्णविराम लागला. जवळपास वर्षभरानंतर पुन्हा एकदा या चर्चा सुरू झाल्या आहेत. मध्यंतरी अजित पवार यांची एन्ट्री झाल्यानंही एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पद धोक्यात असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता पुन्हा देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
शिंदे-पवारांवर दबावतंत्र? :आघाडी सरकारच्या काळात जाहीरनाम्यातही प्रिंटिंगच्या चुका झाल्या होत्या व ते प्रकरणही चांगलंच गाजलं होतं. त्यानंतर भाजपाची ही सोशल मीडियाची 'पोस्ट मिस्टेक' म्हणायची का असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झालाय. त्या पलीकडं जाऊन भाजपानं आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर केलेली ही पोस्ट खरच चुकून केली होती की सत्तेतील प्रमुख सहभागी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि् अजित पवार यांची राष्ट्रवादी यांना भविष्यातील वास्तवाची जाणीव करून देणारं 'दबावतंत्र' होतं? याही प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा नक्कीच प्रयत्न होईल.
नेमका अर्थ काय? : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेनं भाजपाला १०५ आमदारांचं स्पष्ट बहुमत दिलेलं असतानासुद्धा अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत व भाजपामध्ये बेबनाव झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात राज्यात सरकार स्थापन केलं. हे सरकार जेमतेम अडीच वर्षे टिकले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केलं व राज्यात शिंदे - फडणवीस सरकार स्थापन झालं. या सरकारला एक वर्ष होत नाही तोच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडत ते सुद्धा शिंदे - फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. परंतु, या सर्व घडामोडी होत असताना एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील हे ठामपणे देवेंद्र फडणवीस सतत सांगत आले आहेत.
सध्याच्या परिस्थितीत मी पुन्हा येणार, चर्चेत : सध्या राज्यात शिवसेनेच्या १६ अपात्र आमदारांचा मुद्दा फार मोठ्या प्रमाणात गाजत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फूट पाडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा याबाबतही अद्याप निर्णय झालेला नाही. अशा परिस्थितीमध्ये 'मी पुन्हा येईन' हे राज्यभर घुमणारे देवेंद्र फडणवीस यांचे शब्द भाजपाकडून ट्विट करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिर्डी दौरा झाल्यानंतर शुक्रवारी हे ट्विट करण्यात आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी पुन्हा येणार : शुक्रवारी महाराष्ट्र भाजपानं देवेंद्र फडणवीस यांचा 'मी पुन्हा येईन' हा व्हिडिओ ट्विट केल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याचे संकेत दिले आहेत. या ट्विटमध्ये 'महाराष्ट्राच्या निवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन' असे सांगण्यात आले आहे. या व्हिडिओमुळं पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवाऱ्या वाढलेल्या आहेत. अशात मंत्रिमंडळाचा विस्तारही रखडलेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल भाजपा ट्विटर हँडलवर केले गेलेले हे ट्विट बरेच काही सांगून जाते.
हेही वाचा -
- Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन; आम्ही 'मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी'
- Devendra Fadnavis On Contract Recruitment : कंत्राटी भरती 'महाविकास आघाडी'चं पाप; 'तो' जीआर रद्द - देवेंद्र फडणवीस
- Sanjay Shirsat On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी आता केंद्रात राज्याचं नेतृत्व करावं - संजय शिरसाटांनी लावली कळ