मुंबई - फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रान यांच्याविरोधात देशातील अनेक भागात मुस्लीमधर्मियांकडून आंदोलने होत आहेत. मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र काढण्याचे कृतीचे त्यांनी समर्थन केले होते. त्याविरोधात आता मुंबईतही पडसाद उमटले आहेत. फ्रान्सविरोधात काही भागात आंदोलने झाली. शहरातील मोहम्मद अली रोड, नागपाडा, भेंडी बाजार, जे जे रुग्णालय परिसरात काल (गुरुवार) फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे छायाचित्र पायदळी घेतले. यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये मुंबई पोलिसांकडून कलम 144 लागू करण्यात आले आहे. भायखळा मशीद बंदर परिसरामध्ये आज काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या वेळी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आंदोलनांतर संबित पात्रा यांचा महाराष्ट्र सरकारला सवाल
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे छायाचित्र पायदळी घेण्यात आले. त्यावरून भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी महाराष्ट्र सरकारला सवाल केला आहे. मुंबईच्या रस्त्यांवर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा अपमान का करण्यात येत आहे, असे त्यांनी महाराष्ट्र सरकारला विचारले आहे.
'महाराष्ट्र सरकारच्या सत्तेत हे काय सुरू आहे. सगळा भारत फ्रान्ससोबत उभा आहे. दहशतवाद आणि जिहादच्या विरोधात लढण्याची प्रतिज्ञा पंतप्रधान मोदींनी फ्रान्ससोबत केली आहे. तर मग मुंबईच्या रस्त्यांवर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा अपमान का'? असा सवाल त्यांनी महाराष्ट्र सरकारला विचारला आहे.
मध्य प्रदेशातही फ्रान्सविरोधी आंदोलन
भोपाळ शहरातील कव्वाल मैदानात मुस्लीमधर्मियांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युअल मॅक्रान यांच्या विरोधात आंदोलन केले. काँग्रेस आमदार आरिफ मसूद यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्या आले. येथे देखील आंदोलकांनी मॅक्रान यांची प्रतिमा पायदळी घेतली. तसेच त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. मध्य प्रदेश शांततापूर्ण राज्य आहे. जो कोणी या शांततेला भंग करण्याचा प्रयत्न करेल, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यईल. कोणीही असो, त्याला सोडणार नाही, असा संदेश मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिला आहे.
भारत सरकारची भूमिका
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रान्समधील दहशतवादी हल्ल्यांचा काल (गुरुवारी) निषेध केला. हल्ल्यातील पीडित नागरिक आणि फ्रान्सच्या जनतेसोबत आमच्या भावना आहेत. दहशतवादाविरोधातील लढ्यात आम्ही फ्रान्सबरोबर आहोत, असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले. मोदींनी ट्विट करून फ्रान्सला उघडपणे पाठिंबा दिला आहे.
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या व्यंगचित्रानंतर वाद
फ्रान्समधील एका शिक्षकाने वर्गात शिकवत असताना प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र दाखविले होते. त्यानंतर मुस्लीम कट्टरतावाद्याने या शिक्षकाचा भररस्त्यात शिरच्छेद केला. या घटनेचे संपूर्ण देशात पडसाद उमटले होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एम्यॅन्युअल मॅक्रान यांनी या घटनेचा कठोर शब्दांत निषेध केला. मुस्लीम धर्माबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. अनेक मुस्लीम देशांनी फ्रेंच मालावर बहिष्कार घालण्याची हाक दिली. पाकिस्तान, बांगलादेश, कतार या देशांसह अनेक देशांत आंदोलने झाले. शिक्षकाच्या हत्येनंतर फ्रान्स पोलिसांनी देशातील कट्टरतावाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी शंभरपेक्षा जास्त ठिकाणांवर छापे टाकले.
काय म्हणाले होते फ्रान्सचे राष्टाध्यक्ष ?
व्यंगचित्र वर्गात दाखविल्याप्रकरणी मॅक्रान यांनी माफी मागण्यास नकार दिला. तसेच जगभरात मुस्लीम धर्म संकटात असल्याचे ते म्हणाले. कट्टरतावाद्यांविरोधात लढण्यासाठी उपाययोजना करण्याची त्यांनी घोषणा केली. धर्मनिरपेक्षता फ्रान्सचा मूळ गाभा असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर मुस्लीम देशांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. मॅक्रान यांनी व्यंगचित्र काढण्याच्या कृतीचे समर्थन केले.
मुस्लीम देशांतूनही निषेध
जगभरातील मुस्लीम देशांनी मॅक्रान यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.आंदोलकांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रान यांच्या विरोधी घोषणा दिल्या तसेच फ्रान्सचा झेंडा जाळून निषेध केला. 'आम्ही फ्रान्स राष्ट्राध्यक्ष मॅक्रान यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. फ्रान्सच्या मालावर सर्व मुस्लीम देशांनी बहिष्कार घालण्याचे आवाहन करतो, असे एक आंदोलक म्हणाला. अनेक आखाती देशांनी फ्रान्सच्या मालावर बहिष्कार घातला आहे. पाकिस्तानातही मोठे आंदोलन उभे राहिले आहे. पाकिस्तानने फ्रान्सबरोबरचे राजनैतिक संबंध तोडून टाकावे आणि राजदूताला माघारी पाठवावे, अशी मागणी आणखी एका आंदोलकाने केली.
फ्रान्समध्ये चाकूहल्ला
फ्रान्समध्ये काल (गुरुवार) झालेल्या चाकू हल्ल्यात तीन व्यक्तींचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले. देशाच्या दक्षिण भागातील नीस शहरात एका चर्चजवळ ही घटना घडली. फ्रान्समधील शिक्षकाचा शिरच्छेद केल्यानंतर संपूर्ण फ्रान्समध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर काल पुन्हा चाकूहल्ल्याची घटना घडली. या हल्ल्यामागे कट्टरतावादी किंवा दहशतवादी आहेत का? या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.