भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये संवाद साधताना मुंबई :सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या धास्तीने मंत्रालयात पळापळ सुरू असून सरकारने आवरावर सुरू केल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे. मात्र, ज्यांना स्वतःच्या पक्षात आणि महाविकास आघाडीत काडीचीही किंमत नाही, त्यांनी बोलू नये अशी जहरी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.
तुमच्या पक्षात किती किंमत? : केशव उपाध्ये म्हणाले की, शिंदे फडणवीस सरकारवर टीका करताना आता हे सरकार घाबरले असून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने धास्तावले आहे असे नाना पटोले म्हणाले आहेत. वास्तविक असे म्हणताना नाना पटोले यांनी त्यांना स्वतःच्या पक्षांमध्ये किती किंमत आहे, हे आधी तपासून पहावे. त्यांच्या स्वतःच्या पक्षांमध्येच अंतर्गत कुरबुरी सुरू असून त्यांचा शब्द पक्षांमध्ये कोणीही प्रमाण मानत नाही हे उघड आहे.
शहाणपणा शिकवू नये :विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या जागेवर लवकरात लवकर विधानसभा अध्यक्षाची निवड व्हावी, यासाठी नाना पटोले सातत्याने महाविकास आघाडी सरकारला त्यावेळी विनंती करत होते. मात्र, त्यांना कुणीही गांभीर्याने घेतले नाही त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये सुद्धा नाना पटोले यांची काय पत आहे, हे स्पष्ट होते. ज्यांची स्वतःच्या पक्षात आणि महाविकास आघाडीत काडीची ही किंमत नाही त्यांनी सरकारला शहाणपणा शिकवू नये. तसेच इतर पक्षांवरही बोलू नये, असे भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले आहेत.
पटोलेंची राज्य सरकारवर टीका :सर्वोच्च न्यायालयात शिंदे गट आणि ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने यावरचा निकाल राखून ठेवला आहे. दरम्यान, या सुनावणीनंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. राज्यातील सत्ता संघर्षामध्ये आता सत्ताधारी पक्षांना फटका बसणार आहे, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षांमध्ये पळापळ सुरू झाली असून धास्तीमुळे मंत्रालयातील आवराआवर सरकारने सुरू केली आहे, अशी टीका त्यांनी नुकतीच केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
हेही वाचा : Journalist Warise Murder Case : पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या हा जाणीवपूर्वक घडवून आणलेला कट : देवेंद्र फडणवीस