महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'काँग्रेस का हाथ, किसानों के खिलाफ', भाजपची टीका

केंद्राने शेतकऱ्यांच्याबाबतीत तयार केलेल्या तीन विधेयकाला काँग्रेस विरोध करत असल्याने आता भाजपकडूनही काँग्रेसवर टीका करण्यात येत आहे.

केशव उपाध्याय
केशव उपाध्याय

By

Published : Sep 21, 2020, 3:14 PM IST

मुंबई -केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठीच 3 विधेयके तयार केली असून कृषी सुधारणा विधेयकांना विरोध करत काँग्रेस का हाथ, किसानोंके खिलाफ, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी पत्रकार परिषद घेत केली आहे.

केशव उपाध्याय म्हणाले, मागील अनेक वर्षे शेतकरी हा बाजारसमितीतील दलालांच्या तावडीत सापडला असून शेतकऱ्यांच शोषण सुरू आहे. या शेतकऱ्यांच्या पायातील बेडी तोडून याला उत्तम किंमत मिळेल तिथे आपला माल विकण्याची संधी प्राप्त होणार आहे. या विधेयका विरोधातील विरोधकांचा प्रचार मतलबी आहे, शेतकरी विरोधी आहे. तसेच शेतकऱ्यांना आता आपला शेतीमाल कोठेही विकता येणार आहे. यापुढील काळात शेतमाल साठवणुकीची व्यवस्था गावपातळीवर करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना आपला माल बाजारातील परिस्थिती पाहून विक्रीसाठी आणता येणार आहे. कंत्राटी शेती ऐच्छिक स्वरूपाची असून याबाबतचे वाद सोडविताना शेतकऱ्यांचे हित जपले जाईल या विधेयकात प्राधान्य देण्यात आले आहे.

त्यामुळे काँग्रेस पक्षाला आपला जाहीरनामा व आपल्या काळात दिलेल्या परवानग्या सुध्दा आठवते नाहीत हे दुर्दैवी आहे. काँग्रेसची हरियाणात सत्ता असताना 2007 मध्ये कंत्राटी शेतीला सुरुवात झाली. काँग्रेसने 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात शेतमाल विक्रीवरील बंधने हटविण्याचे आश्वासन दिले होते. हाच काँग्रेस पक्ष केवळ राजकीय विरोधासाठी या विधेयकांना विरोध करत आहे. शेतकऱ्यांनी या अपप्रचाराला बळी पडू नये, असे देखील आवाहन यावेळी उपाध्याय यानी केले.

उपाध्याय पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने गेल्या सहा वर्षांत अनेक निर्णय घेतले आहेत. पीक विमा योजनेत बदल केल्यामुळे गेल्या 4 वर्षांत शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी 77 हजार कोटींची भरपाई मिळाली आहे. डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. युपीए सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी अंमलात आणण्याची इच्छाशक्ती कधीच दाखविली नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या दिशेने या 3 विधेयकाच्या रूपाने निर्णायक पाऊल टाकण्यात आलेले आहे. पण, विरोधक चुकीचा प्रचार करत आहेत, काँग्रेस का हाथ, किसानोके खिलाफ आहे, अशी टीका देखील उपाध्याय यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details