मुंबई -राज्यातील मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळे १ नोव्हेंबरपर्यंत उघडली नाहीत, तर नाईलाजाने टाळे तोडावी लागतील, असा इशारा भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी दिला. आघाडीच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
मंदिरे उघडण्याच्या मागणीकरिता भाजपने दोन मोठी आंदोलने केली. दोन वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रे पाठवली. साधु-संतांच्या शिष्टमंडळाने भेटीची वेळ मागितली होती ती न देता, अद्याप मंदिरे या सरकारने उघडलेली नाहीत. यामुळे आज भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वात विविध पंथ व संप्रदायांच्या प्रमुख साधु-संतांचे शिष्टमंडळ राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटले.
हेही वाचा -ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची कसरत; मोबाईल नेटवर्कसाठी मुलांची झाडावर सरसर
यावेळी तत्काळ मंदिर उघडण्यासाठी सरकारला सूचना कराव्यात अशी मागणी आम्ही भाजप अध्यात्मिक आघाडीच्या व साधू संतांच्यावतीने केली, तसेच 1 नोव्हेंबरचा आधी मंदिरे उघडी झाली नाहीत तर 1 नोव्हेंबरला मंदिरांचे टाळे आम्ही तोडू, याची कल्पना राज्यपालांना देऊन त्यास जबाबदार हे सरकार असेल, असे अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भोसले यांनी सांगितले.
राज्यपालांना निवेदन देताना आचार्य तुषार भोसले प्रदेश संयोजक, आध्यात्मिक समन्वय आघाडी यांच्यासोबत संजयनाना महाराज धोंडगे विश्वस्त, संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान, त्र्यंबकेश्वर भाऊ महाराज फुरसुंगीकर, केंद्रीय धर्मसभा अध्यक्ष , अ.भा. वारकरी मंडळ सुदर्शन महाराज कपाटे महानुभाव, अध्यक्ष, ग्लोबल महानुभाव संघ आचार्य जिनेंद्र जैन, समन्वयक जैन स्वाध्याय विभाग सुरेंदरसिंग सुरी, शीख पंथ प्रतिनिधी केशवचंद्र दास इस्कॉन प्रतिनिधी, भदन्त शांतिरत्न, अध्यक्ष, मुंबई भिक्कु संघ, नितीनभाऊ मोरे, अध्यक्ष, बौद्ध उपासक उपासिका महासंघ महंत गिरीजानंद सरस्वती, कोषाध्यक्ष, अ.भा. आखाडा परिषद.