मुंबई :जाहिरात नाट्यावरून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप, दावे प्रतिदावे सुरू झालेले आहेत. "देशात मोदी, राज्यात शिंदे" या जाहिरातीवरून भाजपच्या गोटात राज्यात प्रचंड प्रमाणात नाराजी पसरली आहे. दुसऱ्या दिवशी सर्व समावेशक अशी युतीची जाहिरात देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न जरी केला असला तरीसुद्धा भाजपमध्ये अंतर्गत नाराजी राहिली आहेच.
तब्येतीचे कारण पुढे, नाराजी जाहिरातीवर :एकनाथ शिंदे - फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होत असतानाच एका जाहिरातीवरून या युतीमध्ये मिठाचा खडा पडतो की काय? अशी शक्यता निर्माण झाली होती. देशात मोदी, राज्यात शिंदे, अशा पद्धतीची जाहिरात प्रमुख वर्तमानपत्रात दिल्या कारणाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भाजप नेते, कार्यकर्ते शिंदे गटावर नाराज होते. याचा प्रत्यय, शासन आपल्या दारी या कोल्हापूरच्या कार्यक्रमात दिसून आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच्या कोल्हापूरच्या दौऱ्यातून काढता पाय घेतला. तेव्हा त्यांच्या तब्येतीचे कारण पुढे करण्याचे काम भाजपकडून नाही, तर शिंदे गटाकडून करण्यात आले. त्यांच्या कानाला इजा झाली असल्याकारणाने डॉक्टरांनी त्यांना हवाई दौरा करण्यास मनाई केली असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते, आमदार, मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले होते. परंतु दुसऱ्याच दिवशी प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये शिंदे-फडणवीस सरकारच्या कामांच्या कार्याचा गौरव, त्याचबरोबर देवेंद्र फडवणीस यांचा फोटो असलेली जाहिरात दिल्याने अगोदरच्या जाहिरातीवरून असलेली नाराजी दूर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.
कानाची इजा एका जाहिरातीने बरी झाली? :जाहिरातीच्या दोनच दिवसांनी म्हणजे आज, गुरुवार १५ जून रोजी पालघर जिल्ह्यात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईहून एकाच हेलिकॉप्टरने पालघरला पोहोचले. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री यांचा दुखणारा कान, त्यांच्या कानाच्या पडद्याला झालेली इजा एका जाहिरातीने बरी झाली की काय? अशी चर्चा दबक्या आवाजात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या गटात सुरू झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघरचा हवाई दौरा एकत्र केला असला तरी पालघरला हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी ते स्वतंत्र गाडीने गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्यासोबत येण्यास सांगितले. परंतु "तुम्ही पुढे निघा, मी येतो", असं सांगत देवेंद्र फडवणीस त्यांच्यासोबत न बसता ते दुसऱ्या गाडीने कार्यक्रम स्थळी गेले, यावरूनही चर्चा रंगल्या. देवेंद्र फडवणीस अद्यापही नाराज असल्याचे सांगितले गेले. तशा बातम्या ही सर्वत्र पसरल्या.