मुंबई- सुशांतसिंह राजपूत प्रकरणात खोट्याचे खरे करण्याचा प्रयत्न सुरूच आहे. महाराष्ट्र सरकार व मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी 80 हजार फेक अकाऊंटस् समाज माध्यमांवर निर्माण केली. सायबर फौजांचा बेकायदेशीर वापर देशाला, समाजाला घातक ठरू शकतो हे गृहमंत्री अमित शहा यांनी मान्य केले पाहिजे. सुशांतसिंह राजपूत प्रकरण हे मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी कसे, वापरण्यात आले याचा स्पष्ट खुलासा आता झाला आहे. मुंबई पोलिसांनी हे सर्व समोर आणले. पोलिसांचे पाय आता कोणी खेचू नये, असे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' मधून 'रोखठोक' बजावले आहे.
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र राज्य, मुंबई पोलीस, मुख्यमंत्री ठाकरे, गृहमंत्री देशमुख व माझ्यावर एकेरी उल्लेख करून चिखलफेक करण्यासाठी पैशांचा वापर झाला. हे पैसे नक्की कुठून आले, त्यांचा बोलवता धनी आणि पैसे पुरवणारा धनी कोण हे स्पष्टपणे समोर आले पाहिजे, पण चोराच्या उलटय़ा बोंबा सुरू आहेत. त्या चोरांना महाराष्ट्राने आता सोडू नये.
80 हजार फेक अकाऊंटस
सोशल मीडियावर तब्बल 80 हजार किंवा त्यापेक्षा जास्त 'फेक अकाऊंटस्' उघडून पोलिसांची, महाराष्ट्र सरकारची, ठाकरे कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. यातील बहुतेक खाती तुर्कस्तान, जपान, इंडोनेशिया अशा देशांतून चालवली गेली हे समोर आले. हे सर्व कोणाच्या इशाऱयाने आणि मार्गदर्शनाखाली चालले होते त्याचा गौप्यस्फोट करण्याची गरज नसल्याचे संजय राऊत म्हणाले.
ज्यांनी समाज माध्यमांतून राहुल गांधींना 'पप्पू' ठरवले, मनमोहन सिंग यांना 'मौनी बाबा' ठरविले, त्याच लोकांनी सुशांतचे आत्महत्या प्रकरण एक पर्वणी मानले. सुशांतनिमित्ताने त्यांना पोलीस, सरकार व ठाकरे कुटुंबाची बदनामी करायची होती, असे संजय राऊत यांनी रोखठोक मधून स्पष्ट केले.