मुंबई - उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल तथा माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांना कोरोनाची लागण झाली आहे. राम नाईक यांनी स्वत:ला गोरंगाव पूर्व, गोकुळधाम येथील लक्षचंडी सोसायटीमधील त्यांच्या घरीच विलगीकरण केले आहे, अशी माहिती राम नाईक यांच्या माध्यम प्रतिनिधींनी दिली आहे.
राम नाईक यांना ताप आला होता. त्यानंतर त्यांनी लागलीच कोरोना चाचणी केली. या चाचणीत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. दरम्यान, मालाड पूर्व संजीवनी रुग्णालयाचे डॉ. सुनिल अग्रवाल व डॉ. राजेश बिनयाला यांच्या देखरेखीखाली राम नाईक यांच्यावर तत्काळ उपचार सुरु करण्यात आले असून त्यांची तब्येत सुधारत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कठोर निर्बंधानंतरही कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता तसूभरही कमी झालेली नाही. या उलट राज्यातील रोज दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूंच्या संख्येचा उच्चांक गाठत असल्याने कोरोनाचे संकट राक्षसाचे रुप धारण करत आहे. राज्यात रविवारी (दि. 18 एप्रिल) 68 हजार 631 रुग्ण आणि 503 मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी कोरोना बाधितांची एकूण संख्या 38 लाख 39 हजार 338 असून मृतांचा एकूण आकडा 60 हजार 473 झाला आहे.