मुंबई - सचिन वाझेंनीच आपल्या पतीचा खून केल्याचा थेट आरोप मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला मनसुख यांनी पत्राद्वारे केला आहे. वाझेंविरोधात भक्कम पुरावे असतानाही ठाकरे सरकार खुन्यांना पाठीशी घालत आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला.
पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी करा
विरोधी पक्षाने कायदा व सुव्यवस्था या विषयावर नियम २६० अन्वये दिलेल्या प्रस्तावावर गृहमंत्री अनिल देशमुख विधान परिषदेत उत्तर देत असताना हरकतीचा मुद्दा उपस्थित करून दरेकर यांनी सचिन वाझेंच्या अटकेची मागणी केली. दरेकरांनी असेही सांगितले की, 'ठाकरे सरकारच्या कार्यपद्धतीविषयी संशय व्यक्त केला जात आहे. पूजा चव्हाण प्रकरणातही ठाकरे सरकारने २० दिवस एफआयआर दाखल करून घेतला नाही. त्यातही असाच वेळकाढूपणा केला. अरुण राठोड आजही गायब आहे. हॉस्पिटलमध्ये भरती झालेली पूजा अरुण राठोड कोण आहे, याचाही अजून पत्ता लागलेला नाही. लॅपटॉपमधील पुरावेही गायब करण्यात आलेले आहेत. पुरावे नष्ट झाल्यानंतर संजय राठोडांचा राजीनामा घेतला गेला.'
हेही वाचा -विरोधकांनी लावलेल्या आरोपांबाबत सचिन वझेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
महाविकास आघाडी सरकारवर विश्वास राहिला नाही
मनसुख हिरेन प्रकरणातही ठाकरे सरकार असाच वेळकाढूपणा करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे का, असा संशय माझ्यासारख्या व्यक्तीला वाटत असून महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातही हेच प्रश्न आहेत. महाराष्ट्रात खुलेआम हत्या होत असून राज्यातील जनतेचा या महाविकास आघाडी सरकारवर विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे सकृतदर्शनी पुरावे असलेल्या सचिन वाझेंना तत्काळ अटक करा, अशी मागणी दरेकरांनी केली. याच गोंधळात विधान परिषदेची विशेष बैठक स्थगित करण्यात आली, त्यानंतर सभागृहाची नियमित बैठक सुरू झाल्यानंतर दरेकरांनी तीच मागणी पुन्हा लावून धरल्याने प्रश्नोत्तराचा तासदेखील स्थगित करण्यात आला.
क्राईम ब्रँचमधून हटवले
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर २५ फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळून आली होती. या प्रकरणाचा तपास एटीएस करत होते. मात्र, केंद्राच्या एनआयएकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी एटीएसमार्फत चौकशी केली जात आहे. तसेच, सचिन वाझे यांना क्राईम ब्रँचमधील पदावरून बाजूला केले आहे. 'वाझेंविरोधात विरोधकांकडे पुरावे असल्यास, एटीएसला द्या. एटीएसमार्फत पूर्णतः निःपक्षपातीपणे आणि नियमानुसार चौकशी केली जाईल,' असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. तसेच, या प्रकरणात कोणाच्याही जावयाला सोडणार नाही, असे गृहमंत्री देशमुख यांनी म्हणाले.
हेही वाचा -मोहन डेलकर आत्महत्येप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल