मुंबई Pravin Darekar On Bhupesh Baghel : मुख्यमंत्री भूपेश बघेल (CM Bhupesh Baghel) यांचे नाव महादेव ॲप (Mahadev App) प्रकरणात समोर आले आहे. भूपेश बघेल यांचा सट्टेबाजांशी संबंध असून त्यांनी या ॲपच्या माध्यमातून गोळा झालेला पैसा निवडणुकीसाठी वापरल्याची माहिती ही हाती येत आहे. याप्रकरणी ईडीने त्यांच्यावर छापेमारी केली आहे. यातून आता अनेक बाबी समोर येतील असा दावा प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
450 कोटी जप्त : महादेव ॲपच्या माध्यमातून काही लोक परदेशात बसले असून, कोट्यावधी रुपये गोळा करत आहेत. या माध्यमातून गोळा झालेला पैसा अवैधरित्या निवडणुकीसाठी आणि अन्य कामांसाठी वापरला गेल्याची माहिती ईडीच्या हाती लागली होती. त्यानुसार ईडीने छापेमारी करून कारवाई केली आहे. या कारवाईत भूपेश बघेल यांचंही नाव पुढे आले आहे. याप्रकरणी असीमदास याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून पाच कोटी 38 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. तर अन्य काही खातेधारकांच्या नावावर बँकेत पैसे असल्याचे समोर आल्यामुळे, पंधरा कोटी रुपये विविध खात्यांमधील गोठवण्यात आल्याची माहिती दरेकर यांनी दिली. दरम्यान या सर्व प्रकारातून 450 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. या रकमेच्या वापराशी काँग्रेसचा संबंध स्पष्ट होत असल्याने, नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या काँग्रेसने आता या प्रश्न उत्तर द्यायला पाहिजे अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.