मुंबई -राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत झालेला पराभव भाजपच्या जिव्हारी लागला असून लवकरच पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा राजकीय स्तिथीचा आढावा घेणार आहेत . येत्या 19 डिसेंबरला नड्डा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. परिषदेच्या सहापैकी केवळ एका जागेवर भाजपाला विजय मिळवता आला आहे. सहा पैकी किमान पाच जागा भाजपला मिळतील, असा दांडगा आत्मविश्वास पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केला होता. मात्र, अनपेक्षितपणे महाविकास आघाडीने मुसंडी मारत चार जागा मिळवल्या तर एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय स्तिथीचा भाजपचे अध्यक्ष नड्डा आढावा घेणार आहेत.
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात राज्यातील ज्येष्ठ नेत्यांची फौज विधान परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारात उतरली होती. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस , प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सामोरे जाताना भाजप या निवडणुकीतही नेत्रदीपक यश मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी सर्वांना धक्का देत विजय संपादन केला.
नागपुरातील पन्नास वर्षांची भाजपची मक्तेदारी महाविकास आघाडीने काढली मोडून
नागपूर पदवीधर मतदार संघात तर गेल्या पन्नास वर्षांपासूनची भाजपची मक्तेदारी महाविकास आघाडीच्या उमेदवाराने मोडून काढली. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि फडणवीस यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, एकत्रित लढणाऱ्या आघाडीच्या ताकदीचा अंदाज आला नसल्याचे वेगळे निकाल लागले. आता एकत्रीत लढणाऱ्या महाविकास आघाडीचा सामना कसा करावा याबाबत भाजपमध्ये विचार मंथन सुरू झाले आहे.
परिषद निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच पराभवाच्या कारणांची चर्चा
परिषद निवडणुकीचे निकाल भाजपच्या बाजूने लागत नसल्याचे चित्र असतानाच भाजप प्रदेश कार्यालयात कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतही पराभवाच्या कारणांची चर्चा झाली. लवकरच याबाबतचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांसाठी विशेष कार्यक्रम आखण्यात येणार आहे.