मुंबई : उत्तर भारतीय मतांसाठी ठाकरे शिंदे गटाचे जोरकस प्रयत्न सुरू आहेत. जो आपल्या सोबत येईल, तो आपला कारण प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. अशातच उत्तर भारतीय समाज, उत्तर भारतीयांची मते आपल्याकडे वळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीय समाजाचा मेळावा घेतला. त्यामध्ये त्यांनी त्यांना आपल्या सोबत राहण्याच आव्हान केले आहे.
ठाकरे यांच्यावर निशाणा साधला: दुसरीकडे मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी उत्तर भारतीय मोर्चा व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ज्यांनी राम मंदिर आणि राम सेतूची खिल्ली उडवली त्यांना हिंदी भाषिक समाज ओळखून आहे. हा समाज हे जाणतो की, जो ना भगवान राम का, वो ना किसी काम का, असा टोला भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी लगावला आहे. तसेच है तय्यार हम, हे अभियान आम्ही हाती घेत असल्याचे सांगितले. भाजप पदाधिकाऱ्यांची व उत्तर भारतीय मोर्चाची मुंबईत बैठक झाली त्याप्रसंगी ते बोलत होते.
मिशन १५० चा संकल्प: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव व धनुष्यबाण ही निशाणी शिंदे गटाला दिल्यानंतर एकीकडे शिंदे - फडणवीस सरकार मध्ये आनंदाचे वातावरण असले तरी दुसरीकडे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पूर्ण ताकतीनिशी मिशन १५० चा संकल्प करत भाजप मैदानात उतरली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पाहता मुंबईत राजकारण तापू लागलेले आहे. सर्व स्तरातील मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी व महाविकास आघाडी कसोशीचे प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे भाजपनेही कंबर कसली आहे. कालच उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये उत्तर भारतीय सभेमध्ये उत्तर भारतीय ना त्यांच्यासोबत राहण्याचे आव्हान केले. लगेचच आज मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व उत्तर भारतीय मोर्चाची बैठक घेऊन मुंबई महानगरपालिकेसाठी रणनीती बनवली.