मुंबई :मोदी सरकारने मुंबईला अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेले आयआयएम भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळात निर्णय झाला असून लवकरच हे विधेयक सभागृहात चर्चेला येणार असल्याची माहिती भाजप नेते, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली. आशिष शेलार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत याविषयीची माहिती दिली. मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजीनियरिंग आयआयएमची मान्यता मिळणार आहे. याचे विधेयक लवकरच संसदेत मांडले जाणार आहे, यावरुन बोलताना आशिष शेलार यांनी उबाठा नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. आदित्य ठाकरे यांनी नेहमी महाराष्ट्रात विद्यार्थी विरोधी भूमिका घेतली, असल्याचा आरोपही शेलार यांनी यावेळी केला.
आयआयएमची मान्यता : मुंबईकरांना लवकरच नवीन आयआयएम (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट) मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच त्याला मान्यता दिली आहे. याबाबत बोलताना भाजप नेते, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, मुंबई भारतीय जनता पक्ष आणि मुंबईकरांच्या वतीने मी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आभार मानतो. कारण 65 वर्ष काँग्रेसचे राज्य असताना मुंबईकरांना जे भेटले नाही, असे नवीन आयआयएम मुंबईला भेटणार आहे. नुकतीच केंद्रीय मंत्रीमंडळाने त्याला मान्यता दिली आहे. मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजीनियरिंग, पवई( नीटी)ला आयआयएमची मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता तरुणांना अन्य राज्यात जाण्याची गरज भासणार नाही. तसेच मुंबईत 350 जागा एमबीएच्या घेवून हे आयआयएम सुरू होणार आहे. इतकी मोठी भेट केंद्राकडून मुंबईला भेटत असताना कुठल्याही एकाही विरोधी पक्षाने त्याची प्रशंसा व त्याला दाद दिली नाही.
महाराष्ट्रात विद्यार्थी विरोधी भूमिका: दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात नेहमी विद्यार्थी विरोधी भूमिका घेतली असल्याचे सांगत त्याचे दाखले शेलार यांनी दिले. शेलार म्हणाले की, ज्यांना कावीळ झाली आहे, त्यांना सर्व पिवळे दिसते. आदित्य ठाकरे यांना ती होऊ नये, अशी माझी इच्छा आहे. आजकाल पावसानंतरचे आजार पसरत आहेत. तसेच त्यांना राजकीय कावीळ झाली आहे का? हा प्रश्न मी त्यांना नक्की विचारेन, असा टोला शेलार यांनी यावेळी लगावला. आदित्य ठाकरे यांनी नेहमीच महाराष्ट्रात विद्यार्थी विरोधी भूमिका घेतली आहे. त्यांचे सरकार असताना राज्यात विद्यापीठांच्या विरोधातले निर्णय घेतले गेले. हे निर्णयसुद्धा कुलगुरूंच्या, कुलपतींच्या दालनात न घेता आदित्य ठाकरे यांच्या दालनात घेतले गेल्याची टीका शेलार यांनी केली.