महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत भाजप विधिमंडळ नेता निवड बैठक; काय असणार उद्धव ठाकरेंची भूमिका? - भाजप आमदारांची मुंबईत बैठक

शिवसेनेला विचारात न घेता भाजप गटनेत्याची निवड करत आहे. समसमान जागा वाटपाचा काही फॉर्म्यूला ठरला नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही राज्यात नव्या आघाडीचे संकेत दिले आहेत.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे

By

Published : Oct 30, 2019, 10:52 AM IST

Updated : Oct 30, 2019, 11:44 AM IST

मुंबई - सत्तेत "५०-५०' फॉर्म्युला ठरलाच नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटल्यानंतर शिवसेनेने युतीची बैठक रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आज भाजपच्या विधीमंडळ गटनेत्याची निवड करण्यासाठी भाजप आमदारांची मुंबईत बैठक होणार आहे. बहुमत असलेल्या पक्षाचा विधीमंडळ नेताच बहुतांशी मुख्यमंत्रीपदाचा मानकरी ठरतो. मात्र शिवसेनेला विचारात न घेता भाजप गटनेत्याची निवड करत आहे. समसमान जागा वाटपाचा काही फॉर्म्यूला ठरला नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यातील जनतेने शिवसेना-भाजप महायुतीच्या पारड्यात बहुमत दिले. महायुतीचेच सरकार येणार हे चित्र स्पष्ट दिसत असले तरी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत समान वाटा, या शिवसेनेच्या मागण्यांवरून शिवसेना-भाजप वाद चिघळल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. 'लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती करताना अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाबाबत कधीच शब्द दिला नव्हता. तसे आश्वासन दिलेच नव्हते', असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

हेही वाचा -राज्यात नवे समीकरण...! काँग्रेसने दिले शिवसेनेबरोबर जाण्याचे संकेत?

मुख्यमंत्र्यांच्या या विधानांनंतर शिवसेना आक्रमक झाली. त्यातूनच 'चर्चा करून फायदा काय?' असा सवाल करत पक्षाने मंगळवारी जागावाटपाबाबत होणारी युतीची बैठकच रद्द केली होती. त्यानंतर शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राउत यांनी, महाराष्ट्राच्या कुंडलीत असेल तेव्हा महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळेल, अशी मार्मिक टिपण्णी केली आहे. राऊत यांनी सरकार स्थापनेची अनिश्चितता अधोरेखित केली. मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल का, या प्रश्नाकडे मात्र त्यांनी दूर्लक्ष केले.

शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राउत

दरम्यान, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही राज्यात नव्या आघाडीचे संकेत दिले आहेत. शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करून निर्णय घेऊ, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर असे विधान करून त्यांनी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

Last Updated : Oct 30, 2019, 11:44 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details