मुंबई :राज्यपालांच्या अभिभाषनाच्या ठरावावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम सातपुते यांच्याकडे पाहून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच निवडून आलात. त्यामुळे सनातन आणि हिंदू धर्माच्या संदर्भात आपण कधीपासून गोडवे गायला लागला अशी विचारणा केली. या संदर्भात राम सातपुते यांनी आक्रमक प्रतिउत्तर देताना होय मी बाबासाहेबांमुळे निवडून आलो. माझे वडील चपला शिवायचे याचा मला अभिमान आहे. मला बाबासाहेबांनी आरक्षण दिले. शरद पवारने नाही अशा शब्दात शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संतापले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आक्रमक :राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम सातपुते तुम्ही ज्या मतदारसंघातून येता तो मतदारसंघ राखीव आहे. तो राखीव असल्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले योगदान आहे. याची आठवण राम सातपुते यांना करून दिली. मात्र, ही बाब पचनी न पडलेल्या राम सातपुतेंनी आंबेडकरांनी घटना दिली. परंतु 'तुमच्या पवाराने आरक्षण दिले नाही' असा एकेरी उल्लेख केला. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक होऊन वेलमध्ये उतरले. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी अध्यक्षांना वक्तव्य तपासून सांगेपर्यंत असा नवीन पायंडा तयार करता का? असा सवाल यावेळी केला.
अखेर मागितली माफी : विशेष म्हणजे भाजप आमदार आशिष शेलार यांनीही राम सातपुते यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. राम सातपुते यांनी माफी मागावी यासाठी राष्ट्रवादी आमदार आक्रमकच राहिले. माफी मागेपर्यंत आमदार घोषणाच देत राहिले. शेवटी विधानसभा अध्यक्षांनी राम सातपुते यांना सूचना केली. राम सातपुते यांनी माफी मागितल्यानंतर सभागृहाचे कामकाज पूर्ववत सुरू झाले.