मुंबई -सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडसंदर्भातील अनेक गोष्टी समोर आल्या. बॉलिवूडमध्ये असलेल्या घराणेशाहीचा मुद्दा खूप चर्चेत आला होता. अभिनेत्री कंगना राणावतने हा मुद्दा उपस्थित केला. शिवाय यापुढे खटल्यामध्ये मदत करण्यास कंगना तयार असल्याने तिने स्वतःला संरक्षण मिळावे, अशी मागणी केली. कंगना राणावत ड्रग्स माफिया आणि नेते, अभिनेत्यांची नावे सांगत असताना तिला सुरक्षा का नाही? असा प्रश्न भाजप नेते राम कदम यांनी उपस्थित केला आहे.
कदम म्हणाले, अभिनेत्री कंगना राणावतने सिनेसृष्टीत कोण अभिनेते, नेते अमली पदार्थ घेतात आणि कोण विक्री करतात त्यांची नावे उघड करण्याची तयारी दाखवली आहे. यासाठी तिचे देशभरातून कौतुक होत आहे. मात्र, यासाठी तिने पोलीस सुरक्षेची मागणी केली आहे. ती सर्व नावे सांगण्यास तयार असताना पोलिसांनी तिच्याकडून का जाणूण घेतलेले नाही. तिला सुरक्षा का पुरवण्यात आलेली नाही. नेते, अभिनेते यांची नावे बाहेर येऊ नयेत, अशी महाराष्ट्र सरकारची इच्छा आहे का? असा प्रश्न त्यांनी केला.