मुंबई -मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात मिळालेल्या स्थगितीमुळे विविध पदावर मराठा समाजातील नियुक्त झालेल्या मराठा समाजातील तरुणांना रुजू होता आलेले नाही. याच्या विरोधात मराठा समाजातील तरूण आझाद मैदानात गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आज (24 जाने.) या तरुणांची भेट विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी घेतली. आझाद मैदानावरील आंदोलनास सहा दिवस झाले असून सरकारमधील एक जणही या ठिकाणी आला नाही. हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे का, असा सवाल यावेळी दरेकर यांनी उपस्थित केला.
राज्यसरकरच्या नातर्कपणामुळे मराठा समाजावर ही परिस्थिती ओढवली असल्याच आरोप यावेळी त्यांच्याकडून करण्यात आला. भाजप सरकारने मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत असलेले आरक्षण दिले. मात्र, राज्यसरकारच्या ढिसाळ कारभारामुळे सर्वोच्च न्यायालयात ते टिकू न शकल्याचा ठपका त्यांनी ठेवला. त्यामुळे येणाऱ्या काळात हे आंदोलन पेटले तर त्यासाठी राज्यसरकार जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी दिला.