मुंबई- राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरू असतानाच रुग्णांसाठी प्राणवायू ठरत असलेल्या रेमेडिसिव्हीर औषधावरून सुरू असलेल्या गलिच्छ राजकारणातील दुसरा अध्याय मध्यरात्री पाहायला मिळाला. राज्यात कोरोना रुग्णांचे हेलपाटे सुरू असतानाच दमणमधील ब्रूक्स फार्मा कंपनीकडे तब्बल 60 हजार इंजेक्शनचा साठा असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्या आधारावरच ब्रूक्स फार्मा कंपनीचे मालकांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. या सगळ्या प्रकरणावर भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी सरकारवर टीका करत सरकारची दडपशाही सुरू आहे, असा आरोप केला आहे.
मुंबई पोलिसांनी ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र, या कारवाईनंतर भाजप नेत्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांना का ताब्यात घेतले, अशी विचारणा केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड यांनी बीकेसीमधील पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला. पोलिसांनी राजेश यांना चौकशीसाठी बोलावले होते सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर त्यांना सोडण्यात आल्याचे सांगितले. दरम्यान, फडणवीस यांनी एका मंत्र्याच्या ओएसडीने धमकी दिल्याचा आरोप केला. फडणवीस यांनी या प्रकरणात ट्विटसुद्धा केली आहे.