मुंबई - महाराष्ट्रात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करण्यासाठी केंद्र सरकारकडून पीएम केअर फंडातून निधी देण्यात आला होता. मात्र, आघाडी सरकारने या निधीचा विनियोग योग्य प्रकारे केला नाही. केंद्राने दिलेला निधी आणि मुख्यमंत्री निधीतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे केले असते तर राज्यात ऑक्सिजन अभावी अनेकांचा बळी गेला नसता, असा सणसणीत टोला भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला.
हेही वाचा -मुंबई : पवनधाम कोविड सेंटर उद्यापासून सुरू होणार; पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती
केंद्र सरकारने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी दिलेल्या निधीचे काय केले? याचा आघाडी सरकारने हिशोब द्यावा, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली. आज पत्रकार परिषदेत बोलताना, कोरोनाच्या महामारीच्या काळात कोणत्याही राज्याला अत्यावश्यक असलेल्या ऑक्सिजनची कमतरता भासू नये. प्रत्येक राज्य या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी केंद्र सरकारने जानेवारी 2020 मध्ये राज्य सरकारांना पत्रे पाठवली होती. त्यानुसार पीएम केअर निधीतून महाराष्ट्राला दहा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करण्यासाठी निधी देण्यात आला. मात्र, गेल्या चार ते पाच महिन्यांत या निधीचा वापर करून राज्य सरकारने एकही प्रकल्प सुरू केला नाही. गेल्या काही दिवसांत ऑक्सिजन अभावी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. केंद्राने दिलेला अर्थसहाय्य व मुख्यमंत्री निधीत पडून असलेला पैसा यातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे राहिले असते. एका पोलीस अधिकाऱ्याकडून वसुली करणाऱ्या या सरकारने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी दिलेला निधी खाऊन टाकला, अशी घणाघाती टीका प्रसाद लाड यांनी केली.