नितेश राणे यांची पत्रकार परिषद मुंबई :अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडून वेगळा गट स्थापन केला होता. आता अजित पवारांनी राष्ट्रवादीत फूट पडल्याने राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे पाहायला मिळत आहेत. यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी टीकास्त्र सोडले आहे. उबाठा म्हणजेच ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट, तसेच सुप्रिया सुळे गट लवकरच राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचा उपरोधिक दावा राणे यांनी केला आहे. ते आज मुंबईत बोलत होते.
कॉंग्रेसमध्ये विलीन व्हावे :या प्रसंगी बोलताना नितेश राणे म्हणाले की, राज्याच्या राजकारणात ज्या काही घडामोडी सुरू आहेत. त्यात अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर उबाठा गट तसेच सुळे गटाकडून एक प्रस्ताव काँग्रेसकडे गेला आहे. उबाठा गट तसेच सुळे गट यांनी कॉंग्रेसमध्ये विलीन व्हावे असा प्रस्ताव वरिष्ठांकडे दिल्याचा आरोप राणे यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी याबाबत मातोश्रीवर बैठक झाली असून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे हा प्रस्ताव संजय राऊत यांनी दिल्याचे नितेश राणे यांनी सांगितले आहे.
अजित पवारांनी सत्य बाहेर आणले :सुप्रिया सुळे गटाकडून देखील असा प्रस्ताव लवकरच काँग्रेसकडे जाईल असेही राणे म्हणाले आहेत. तसेच येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्रित लढावाव्यात यासाठी सुद्धा हा प्रस्ताव आहे. सोबतच काल अजित पवार यांनी केलेल्या भाषणातून सत्य बाहेर आले आहे. कारण पटणामध्ये जे जमले होते, ते मोदींच्या विरोधात जमले होते, असे सांगत होते. लवकरच मविआचा मुख्यमंत्री बनेल असे सांगत होते. या सर्व गोष्टीचा बुरखा काल अजित पवार यांनी फाडला असल्याचं राणे म्हणाले आहेत. पवार साहेब स्वतः वारंवार असे सांगत होते की, नरेंद्र मोदी शिवाय देशात नेतृत्व नाही. मग कुठल्या तोंडाने हे बैठका घेत होते. जर पवारच मोदींचे नेतृत्व मानत असतील तर दुसऱ्यांना काय किंमत आहे, असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला आहे.
विलीन होताय की नाही यावर बोला? :संजय राऊत यांनी नको त्या विषयावर बोलण्यापेक्षा उबाठा आणि सुळे गट काँग्रेसमध्ये विलीन होत आहे, यावर बोलावे. तसेच उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. यावर बोलताना नितेश राणे म्हणाले आहेत की, जो माणूस आजवर घरातून बाहेर पडला नाही, त्याला पर्यटन बघायचं असेल तर जाऊ दे. पण त्यांनी आधी कॉंग्रेसमध्ये विलीन होताय का याचे उत्तर द्यावे, असा सवालही नितेश राणे यांनी उपस्थित केला.
हेही वाचा -Maharashtra Political Crisis : 'एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला कुठलाही धोका नाही, तर अजित पवार...'