मुंबई -मुंबईमधील प्रसिद्ध बिल्डर व मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा हे भाजपचे कुबेर म्हणून ओळखले जातात. त्यांच्या संपत्तीमध्ये गेल्या १० वर्षात मोठी वाढ झाली आहे. १० वर्षांपूर्वी आमदार म्हणून निवडणूक लढवताना लोढा यांनी आपली संपत्ती ६८ कोटींची दाखवली होती. त्यात अनेक पटीने वाढ झाली असून, यावेळी अर्ज भरताना लोढा यांनी आपली संपत्ती जवळपास ५०० कोटींची दाखवली आहे. त्यात १५ कोटी रुपयांचे सोने चांदी असून १४ लाख रुपयांची एकच गाडी असल्याचे म्हटले आहे.
मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामधून आमदार म्हणून मंगलप्रभात लोढा निवडून आले आहेत. १० वर्षांपूर्वी २००९च्या विधानसभा निवडणुकीवेळी स्थावर ३४ आणि जंगम ३४ अशी ६८ कोटींची मालमत्ता आणि ७ कोटींचे कर्ज असल्याचे लोढा यांनी जाहीर केले होते. २०१४ च्या निवडणुकीत लोढा यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण मालमत्ता २०० कोटी रुपयांची असल्याचे म्हटले होते. गेल्या ५ वर्षांत लोढांच्या संपतीमध्ये ३०० कोटींची भर पडली आहे. मंगल प्रभात लोढा यांनी काल (मंगळवार) मलबार हिल मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. त्यासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ही माहिती दिली आहे.