मुंबई - भाजपला धोबीपछाड दिल्यानंतर आता भाजपनेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्यासाठी रणनिती आखली आहे. त्यानुसार देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत ठाकरेंच्या अडचणी वाढवतील. मात्र, विधानपरिषदेत भाजपकडे तेवढा आक्रमक नेता सध्या नाही. त्यामुळे विधानपरिषदेवर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना आणण्याच्या हालचाली भाजपने सुरू केल्या असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
ठाकरे आणि राणे यांच्यातील वाद हा सर्वश्रुत आहे. त्यात राणे यांना विरोधी पक्ष नेतेपदाचा अनुभव आहे. त्यांची आक्रमकता ही त्यांची जमेची बाजू आहे. शिवाय नियमाच्या आधारे सभागृहाचे काम कसे करायचे? यात राणे वाकबदार आहेत. त्या तुलनेते नवनिर्वाचीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सभागृहाचे आणि प्रशासकीय कामाचा अनुभव तसा नाही. याचाच फायदा घेत राणेंसारखा आक्रमक नेता विधानपरिषदेत असल्यास त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. शिवाय ठाकरे यांना काम करण्यातही मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात.